Thalapathy Vijay : तामिळनाडूत सत्तास्थापनेच्या घडामोडींना आता नाट्यमय वळण मिळाले आहे. सुपरस्टार थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत अजूनही अनिश्चितता कायम असून बहुमताच्या आकड्यावरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला असला, तरी आवश्यक बहुमत अद्याप पूर्ण झालेले नाही. माहितीनुसार, विजय यांनी राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन त्यांना ११६ आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर केले आहे. मात्र, २३४ सदस्यीय तमिळनाडू विधानसभेत सरकार स्थापनेसाठी ११८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे बहुमतासाठी विजय यांना आणखी दोन आमदारांची गरज भासत आहे. दोन आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतरच सत्तास्थापनेचा दावा पूर्व होऊन विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. काल रात्री आमदारांच्या पाठिंब्यासाठी मोठ्या नाट्यमय घडमोडी घडल्या. VCK आणि IUML या पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यांच्या समर्थनाचे अधिकृत पत्र अद्याप राजभवनात जमा झालेली नाहीत. त्यामुळे राज्यपालांनीही शपथविधीला अद्याप मंजुरी दिलेली नसल्याचे सांगितले जात आहे. जोपर्यंत ११८ आमदारांच्या पाठिंब्याची कागदपत्रे सादर होत नाहीत, तोपर्यंत शपथविधीची तारीख जाहीर होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. सुरुवातीला विजय यांचा शपथविधी ९ मे रोजी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, बहुमताचा आकडा पूर्ण न झाल्यास या सोहळ्याला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ‘थलपती’ विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ नेमकी कधी घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. असे आहे पक्षीय बलाबल टीव्हीके – 108 डीएमके – 59 एडीएमके – 47 काँग्रेस – 5 पीएमके – 4 IUML – 2 CPI – 2 हेही वाचा : Suvendu Adhikari : ऐतिहासिक दिवस! सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीला महाराष्ट्रातून ‘हे’ नेते उपस्थित राहणार