बंगळूर – कर्नाटकचे मंत्री आनंद सिंह यांनी सोमवारी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांची भेट घेतली. त्या भेटीने भाजपशासित कर्नाटकात राजकीय सनसनाटी निर्माण होऊन तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
काही मंत्र्यांसह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते 2023 मधील विधानसभा निवडणुकीआधी पक्षबदल करू शकतात, असा दावा अलिकडेच शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या कॉंग्रेस नेत्यांनी केला. अशात शिवकुमार यांच्या निवासस्थानी सिंह पोहचले.
खासगी कारने सिंह आल्याने भुवया आणखीच उंचावल्या गेल्या. मात्र, भेट राजकीय स्वरूपाची नव्हती. एका पर्यटन प्रकल्पाविषयी आमच्यात चर्चा झाली, असा दावा सिंह आणि शिवकुमार यांनी केला.
मंत्री असूनही सिंह उघडपणे माझ्या घरी आले. त्यामुळे भेटीमागे राजकीय हेतू कसा असेल? राजकीय स्वरूपाच्या चर्चा घरी नव्हे; तर हॉटेलमध्ये किंवा गेस्ट हाऊसमध्ये होतात, अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसे असले तरी सिंह आणि शिवकुमार भेट चर्चेचा विषय ठरणार आहे. त्याचे कारण म्हणजे मागील काही काळापासून कर्नाटक भाजपमधील अस्वस्थता वारंवार चव्हाट्यावर येत आहे.