राजकीय पंक्‍तींचा धडाका!

हॉटेलचे “बुकिंग’ वाढले ः कार्यकर्त्यांच्या “पोटोबा’ची सोय

पिंपरी  – शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदार संघातून खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातच असणार आहे. त्यामुळे वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असून त्यासाठी रात्रीच्या पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत. काही नेत्यांनी तर हॉटेल्सच बूक करून ठेवल्याची चर्चा आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात, तर मावळमध्ये शिवसेनेच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि अजित पवार यांचे पुत्र, राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यातच लढत आहे.

ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्यामुळे शिवसेना-भाजपा युतीसह अन्य पक्षांकडूनही विजयाच्या सर्व शक्‍यता पडताळून पाहिल्या जात आहेत. नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट बांधणे आवश्‍यक असल्यामुळे “नाराजां’च्या मनोमिलनासाठी रात्रीच्या मेजवानीचे नियोजन केले जात आहे. या जेवणावळीची जबाबदारी त्या-त्या विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यानुसार ठरावीक हॉटेल्स महिनाभरासाठी बूक करण्यात आली आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानासाठी अवघे पाच दिवस उरले आहे. त्यामुळे राजकीय पंक्ती वाढल्या आहेत. सध्या हॉटेल्समधून दिवसभरात 40 ते 50 कार्यकर्त्यांच्या पार्ट्या झडत आहेत. शिरूर मतदार संघातील खेड, मंचर, नारायणगाव, तसेच मावळातील लोणावळा, कर्जत, खालापूर, पनवेल, तसेच अलिबाग, मुरबाड येथील फार्महाउसवर राबता वाढला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.