पाचगणी (प्रतिनिधी)- पाचगणी नगरपालिकेतील नगराध्यक्ष गटाचे नगरसेवक दिलावर बागवान यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पाचगणी नगरपालिकेत मकरंद पाटील यांचा गट मजबूत झाला आहे. त्यांच्या गटाकडे सद्यस्थितीत दहा नगरसेवक झाल्याने नगरपालिकेचा शेवटचा पॉवर प्ले आता रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
पालिकेत नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या गटाची ताकद राहिली आहे. विरोधकांना चितपट करत विकास कामांचा डोंगर उभा करण्याचा शिरस्ता कऱ्हाडकर यांचा पाहायला मिळत होता. कायद्याचा वापर करत कास्टिंग मताचा वापर करत उपनराध्यक्ष निवडीत विरोधकांना धोबीपछाड करण्याचा कार्यक्रम विरोधी गटाच्या जिव्हारी लागला होता. विरोधी पक्ष नेते नारायण बिरामणे यांच्यासह बिनीच्या शिलेदारांना आ. मकरंद पाटील यांनी ताकत देत नगराध्यक्ष गटाचे विश्वासू नगरसेवक दिलावर बागवान यांनी आमदार पक्षात प्रवेश केल्याने पाचगणीत राजकीय भूकंप झाला आहे.
उपनराध्यक्ष निवडीत जोरदार पीछेहाटीचा फटका बसल्यानंतर आता आमदारांच्या गटाने पुन्हा मुसंडी मारत संख्याबळ गाठण्याकरीता मोहीम आखल्याचे स्पष्ट होते. नगराध्यक्ष गटातील विश्वासू नगरसेवक दिलावर बागवान यांनी काही दिवसांपूर्वी महत्त्वाच्या सर्वसाधारण सभेला अनुपस्थिती दाखवल्यामुळे नारायण बिरामणे व त्यांच्या गटाने नगराध्यक्ष गटाची पिछेहाट केली होती. नारायण बिरामणे व त्यांच्या सहकारी नगरसेकांनी रचलेली बुरुजाची लढाई अखेर बागवान यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाने सुरू झाली आहे. “ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है,’ अशा परिस्थितीत पुढील काही दिवसांत पाचगणी नगरपालिकेत वेगळे राजकारण पाहायला मिळणार असल्याचे संकेत या प्रवेशाने दिले आहेत.