राजकीय पक्षांची भिस्त ‘अॅप’वरच !

– महेश कोळी (संगणक अभियंता)

भारताच्या संसदीय निवडणुकांचा इतिहास 70 वर्षे जुना आहे. अनेक टप्प्यांचा प्रवास करत निवडणुकांचा हा उत्सव अधिकाधिक प्रगल्भ, प्रगत आणि तितकाच हायटेकही होत चालला आहे. पूर्वीच्या काळी निवडणुकांचा हंगाम आला की राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते दारोदार, गल्लोन्‌गल्ली, वाड्या-वस्त्यांवर पायी फिरून प्रचार करताना दिसायचे. किंबहुना विजयाचा तोच फॉर्म्युला होता. पदयात्रा ज्याच्या जास्त त्याला विजयाची अपेक्षा जास्त असायची.

जमिनीवरील संपर्काला अनन्यसाधारण महत्त्व असणारा तो काळ होता. पण आजच्या इंटरनेट युगामध्ये जमिनीवरील लढाईबरोबरच किंबहुना त्याहूनही अधिक मोठी लढाई सोशल मीडिया आणि मेसेजिंगच्या माध्यमातून लढली जात आहे. मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क कमी झाल्यामुळे आणि कार्यकर्त्यांची फौज उभी करणे महाकठीण आणि प्रचंड खर्चिक झाल्यामुळे बहुतांश राजकीय पक्ष आणि उमेदवार-नेते सध्या अॅप्सवर विसंबून राहताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये तर मतदारसंघाचा आकार लक्षात घेता प्रत्येक मतदाराला भेटणे कमी दिवसांत शक्‍य होत नसल्यामुळे राहिलेली पोकळी अॅपच्या माध्यमातून कनेक्‍ट होऊन सांधली जात आहे.

देशात आणि राज्यात सत्तेत असणारा भारतीय जनता पक्ष नमो अॅप आणि नमो टीव्हीच्या माध्यमातून जनतेतील आपले स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे. तर कॉंग्रेस पक्ष प्रोजेक्‍ट शक्‍ती आणि आवाज अॅपवर विसंबून आहे. याच शक्‍ती अॅपवर कॉंग्रेसने उमेदवारांची निवड आणि जाहीरनाम्याबाबत लोकांची मते मागवली होती. या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांबरोबरच अन्य पक्षांनीही अशा प्रकारचे अॅप्स लॉंच केले असून त्यामाध्यमातून लोकसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जनतेची मते आजमावून घेतली जात आहेत.

नमो अॅप : भाजपाकडे यंदाच्या निवडणुकीत हुकमी एक्‍का आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी. त्याचबरोबर मोदींच्या नावाने सुरू झालेल्या नमो अॅपवरही पक्षाचा बराच विश्‍वास आहे. मोदींच्या प्रचंड मोठ्या फॅन फॉलोईंगचा वापर करत भाजपाने या अॅपवरून मागवलेल्या सर्व प्रकारच्या सूचनांचा अवलंब करत आपली रणनीती बनवली आहे. याखेरीज भाजपाकडून वेळोवेळी जे कॅम्पेन लॉंच केले जातात त्यांचेही अॅप लॉंच केले जात आहेत. या अॅप्सवरून भाजपाच्या समर्थकांना पक्षाविषयी आणि नेत्यांविषयी संपूर्ण माहिती मिळते. अलीकडेच सुरू झालेला आणि चर्चेत आलेला नमो टीव्हीही याच शृंखलेतील एक महत्त्वाचा घटक आहे.

कॉंग्रेसची “शक्‍ती’
जमिनीवरील आपली ताकद कमी होत चालल्याचे आणि कार्यकर्त्यांपासून पक्ष दुरावत चालल्याचे लक्षात आल्यानंतर कॉंग्रेसनेही हायटेक मार्गावरून जात प्रोजेक्‍ट शक्‍ती अॅप लॉंच केले. कोणताही मतदार आपला व्होटर आयडी 9702199911 या क्रमांकावर पाठवून प्रोजेक्‍ट शक्‍तीशी जोडला जाऊ शकतो. कॉंग्रेसने हे अॅप बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांशी कनेक्‍ट केलेले आहे. उमेदवार निवडीपासून ते निवडणुकीतील घोषणांपर्यंत सर्व मुद्द्यांवर या अॅपच्या माध्यमातून आपल्या समर्थकांकडून सूचना आणि माहिती मागवली जाते. त्यानुसार पक्षाची रणनीती ठरवली आणि बदलली जाते. शक्‍ती प्रोजेक्‍टशी जोडलेल्या लोकांना व्हॉटसअॅप ग्रुपप्रमाणे मेसेजिंगची सुविधा देण्यासाठी कॉंग्रेसने आयएनसी आवाज हे अॅपही लॉंच केले आहे. यामध्ये बूथ, विधानसभा आणि लोकसभा स्तरावरील वेगवेगळे ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत. शक्‍ती प्रोजेक्‍टशी जोडल्या गेलेल्या युजर्सनाच हे अॅप इन्स्टॉल करता येते. कॉंग्रेसने मध्यंतरी घरघर कॉंग्रेस हे अभियान सुरू केले होते. या संपूर्ण अभियानाचे यश आणि समर्थक-कार्यकर्ते अशा दोन्ही बाजूंनी संवाद निर्मिती होण्यासाठी हे अॅप लॉंच केले. त्याचप्रमाणे भाजपाने जेव्हा चौकीदार अभियान सुरू केले तेव्हा प्ले स्टोअरवर चौकीदार नरेंद्र मोदी 2019 ऍप दिसू लागले होते.

राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच काही प्रादेशिक पक्षांनीही सिंगल मॅन शो’ यांसारखे अॅप आणले आहेत. गुगल प्लेस्टोअरवर अखिलेश यादव यांच्या नावाचा अॅपही उपलब्ध आहे.

याखेरीज सध्याच्या सेल्फीप्रेमी युगामध्ये तरुणवर्गासह बहुतेकांना आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी काढण्याची इच्छा असते. तथापि, ही बाब तितकीशी सोपी आणि सुलभ नसते. म्हणूनच मतदारांची ही इच्छा लक्षात घेऊन प्लेस्टोअरवर सेल्फी आणि फोटो फ्रेम्सवाले अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. या अॅप्सवर राजकीय पक्षांच्या जाहिरातीही दिसतात.

याखेरीज सर्व चर्चित अॅप्लिकेशन्सवरही राजकीय पक्षांची नजर असते. ज्या अॅप्सचा वापर सर्वाधिक केला जातो तिथे राजकीय पक्ष आपला प्रचार जोरदारपणाने करतात. या ऍप्सवर जाहिराती झळकवण्याबाबत राजकीय पक्षांमध्ये स्पर्धाच लागलेली दिसते.

अॅप्सच का?
अॅप्सच्या माध्यमातून एका झटक्‍यात लाखो युवकांपर्यंत पोहोचता येते. जाहिरातींच्या अन्य पर्यायांवर होणाऱ्या वारेमाप खर्चापेक्षा अॅपचा मार्ग तुलनेने स्वस्त ठरतो.

नमो की आवाज?
– भारतीय जनता पक्षाने लॉंच केलेले नमो अॅप जगभरात 100 लाखांहून अधिक मोबाइलवर डाऊनलोड करण्यात आले आहे.
– या अॅपवर मोदींचे भाषण आणि अन्य उपक्रमांची माहिती दिली जाते.
– याखेरीज भाजपाला देणगी द्यावयाची असल्यास त्याचीही सोय या अॅपवर उपलब्ध आहे.
– या अॅपच्या माध्यमातून मतदारांनी केलेल्या सूचना, शिफारशी इतकेच नव्हे तर तक्रारी थेट पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचतात असे भाजपाचे म्हणणे आहे.
– दुसरीकडे कॉंग्रेसचे आयएनसी आवाज हे अॅप 50 लाखांहून अधिक जणांनी डाऊनलोड केले आहे.
– कॉंग्रेस पक्षाचे विचार आणि पक्षाची धोरणे यांविषयीची माहिती या अॅपच्या माध्यमातून दिली जाते.
– इथेही कॉंग्रेसला देणगी द्यावयाची असल्यास अॅपच्या माध्यमातून देण्याची सुविधा आहे.
– पक्षाच्या रचनात्मक उपक्रमांशी जोडले जाण्यासाठी हे अॅप उपयुक्‍त आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.