करोना योद्‌ध्यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी जाहीर केला पाठिंबा

नेत्यांनी घेतली परिचारिका, डॉक्‍टर, वॉर्डबॉयची भेट

पिंपरी – करोना काळात ज्या महिला परिचारिका, डॉक्‍टर, वार्डबाय या कर्मचाऱ्यांनी कोणताही विचार न करता पूर्ण क्षमतेने कोरोना काळात काम केले, त्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने कामावरून कमी केले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी आता महापालिकेविरोधात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज (दि.16) चवथा दिवस असून, आता या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे.
कोविड केअर सेंटर बंद केल्याने मानधनावर काम करणाऱ्या करोना योद्‌ध्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवार पासून (दि. 12) बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू करुन घेणे. आम्ही सर्वांना मानधन तत्त्वावर कायम स्वरुपी करणे. वैद्यकीय सेवेमधील शासकीय नोकरभरती मध्ये करोना योद्‌ध्यांना शासकीय नोकरीत कायमस्वरुपी प्राधान्य देण्यात यावे. त्याच प्रमाणे करोना योद्‌ध्यांना कोविड भत्ता तसेच टी.डी.एस.मिळावा.

केंद्र सरकारने 50 लाखाचा विमा जाहीर केला तो देखील नाही मिळाला तो मानधनावरील सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावा. मानधन तत्वावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी शासकीय सेवेत सामावून घेण्यास विधानसभेची मंजुरी मिळावी. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करावी, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत.

या आंदोलनाला आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेविका वैशाली घोडेकर सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, कष्टकरी पंचायतीचे बाबा कांबळे, रिपब्लिकन पार्टीचे बाळासाहेब भागवत, सुरेश निकाळजे, वाहतूक विभागाचे अजिज शेख यांनी आंदोलकांची भेट घेत, पाठिंबा जाहीर केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.