जयंत ससाणेंचा राजकीय वारसा करण चालवणार?

तालुक्‍यातील कर्तृत्ववान नेत्यांची मुले वारसा चालविण्यात ठरली अपयशी

रामेश्‍वर अरगडे /टाकळीभान: श्रीरामपूर तालुक्‍याच्या राजकीय पटलावर अनेक नेत्यांचा उदय झाला. त्यांनी आपल्या कतृत्वाने तालुक्‍याच्या राजकारणावर छाप सोडली. मात्र त्यांच्या वारसांना त्यांच्या लौकिकास साजेसे कार्य करता आले नाही. मागील तीस वर्षे ज्यांनी तालुक्‍यातील राजकारणावर वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केलेले माजी आ. स्व. जयंत ससाणे यांचे वारसदार युवा नेते करण ससाने यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे ते राजकारणात आपले वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी ठरतील का, हे आगामी काळच सांगणार आहे.

श्रीरामपूर तालुक्‍यात 1970 पासून स्व. गोविंदराव आदिक, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी आ. जयंतराव ससाणे, विद्यमान आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या भोवती श्रीरामपूर तालुक्‍याचे राजकारण वलयांकित झालेले दिसून येते. त्या-त्या कालावधीत या नेत्यांनी तालुक्‍यावर आपली मजबूत पकड ठेवलेली आहे. 1971 साली स्व. गोविंदराव आदिक यांनी तत्कालीन आमदार स्व. भास्करराव गलांडे यांचा पराभव करुन विधानसभेत प्रवेश केला. पुलोद आघाडी सरकारच्या काळात पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच लक्षात राहिली. त्यानंतर राज्यातील कॉंग्रेसच्या सरकारमध्येही त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळले. राज्यभर दबदबा असलेल्या आदिकांचे वारसदार असलेले अविनाश आदिक यांना मात्र श्रीरामपूर तालुक्‍याच्या राजकारणात चमकदार कामगिरी करता आली नाही.

आदिकांचा वारू रोखत माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी धुमधडाक्‍यात विधानसभेत एन्ट्री केली. मुरकुटे यांचा राजकारणातील आक्रमक पणा राज्याला ठावूक आहे. राजकारणातील आक्रमकपणामुळे गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ ते श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर आजही टिकून आहेत. एवढा प्रदीर्घ राजकीय दबदबा आसला, तरी त्यांचे वारसदार आसलेले सिद्धार्थ मुरकुटे यांना तालुक्‍यात तितकासा दबदबा निर्माण कराता आला नाही.

स्व. जयंतराव ससाणे आमदार असताना मुळा-प्रवरा वीज सोसायटीच्या निवडणुकीत सिद्धार्थ मुरकुटे यांनी त्यांना पराभूत केले होते. युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चांगली राजकीय चुणूक दाखवत चांगले काम केले होते. मात्र गेली काही वर्षे त्यांचा संपर्क काहीसा कमी झाल्याने ते काहीसे बकफूटवर गेले आहेत.

मागील दहा वर्षे तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे राजकारणात आपला स्वतंत्र मोठा गट तयार करण्यात अपयशी ठरले, हे वास्तव आहे. कधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, स्व. जयंतराव ससाने, कधी माजी आ. भानुदास मुरकुटे, अविनाश आदिक, नगराध्यक्षा आनुराधा आदिक, सभापती दीपक पटारे, तर आता माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हातात हात धरुन ते लोकसभेच्या निवडणुकिसाठी सज्ज झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांचे राजकीय वारसदार म्हणून ऍड. संतोष कांबळे तालुक्‍यात प्रभावी ठरू शकले नाहीत. अथवा युवकांची तगडी फळी उभी करण्यातही त्यांना यश आले नाही.

स्व. जयंतराव ससाने यांनी 10 वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात शहराबरोबरच ग्रामीण भागातही कार्यकर्त्यांचा मोठा संच उभा केला होता. शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदाच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यात, राज्याबाहेर व परदेशातही मित्रपरिवार जमवला. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कॉंग्रेस अंतर्गत असलेली गटबाजी संपवण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांचे राजकीय वारसदार करण ससाणे यांनी अल्पावधीत श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद पदरात पाडून घेत यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळत राज्य सचिव पदावर उडी घेतली.

ही सर्व जबाबदारी सांभाळीत असताना स्व. ससाने यांनी उभा केलेला कार्यकर्त्यांचा संच सोबत ठेवण्याचीही त्यांनी यशस्वी कसरत केली आहे. त्याचाच परिपाक म्हणून अत्यंत कमी वयात जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्षपदही जिल्ह्यात अत्यंत मातब्बर कॉंग्रेसचे नेते आसतानाही ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्याकडे आले आहे. वडील स्व. जयंतराव ससाणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते राजकीय वारसदार आसल्याचा आलेख उंचावत असल्याचे दिसून येत आहे. ते वडिलांसारखेच तालुक्‍यात वर्चस्व प्रस्थापित करू शकतील काय किंवा इतर नेत्यांच्या वारसांप्रमाणेच ते ही राजकारणाबाहेर फेकले जातात, हे येणार काळच ठरवणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.