वाराणसी – उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीचा अखेरचा टप्पा सुरू झाल्यामुळे आता बहुतेक राजकीय पक्षांचे नेते काशी विश्वनाथ मंदिराकडे जाताना दिसायला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून काशी विश्वनाथ मंदिरात राजकीय नेत्यांची गर्दी बघायला मिळते आहे.
काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्यामुळे त्याचे महत्व विशेष आहे. येथे प्रार्थना करून बहुतेक राजकीय नेते आपल्या पक्षाच्या विजयासाठी याचना करताना दिसत होते.
शुक्रवारी कआँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही येथे जोऊन दर्शन घेतले.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये मतदारांना आवाहन करण्यासाठी रोड शो केला आणि अखेरीस काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतले. पंतप्रधानांनी मंदिरात शोडषोपचार पूजा देखील केली.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही शुक्रवारी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या व्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.
या यादीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि अश्वनी चौबे आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, केंद्रीय सनदी अधिकारी, अनेक व्हिआयपी, पोलीस अधिकारीही काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आले होते, असे मंदिराच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.