शहरातही राजकीय भूकंपाचे संकेत..!

पक्ष बदलाचे लोण पिंपरी-चिंचवडमध्येही ः राष्ट्रवादीचे नेते सेना-भाजपच्या वाटेवर

पिंपरी(प्रतिनिधी)– राज्यभरात सुरू असलेले पक्ष बदलाचे लोण पिंपरी-चिंचवड शहरापर्यंत पोहोचले असून गणेशोत्सवा दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा इतर पक्षात प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपचे तिकीट कोणाला मिळणार याची उत्सुकता ताणली गेली असून तिकीट निश्‍चितीनंतर या मतदारसंघात घडामोडी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

गणेशोत्सवानंतर कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असल्याने राजकीय वातावरण आतापासूनच तापण्यास सुरुवात झाली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. शिवसेनेचा एक खासदार आणि एक आमदार आहे. येत्या विधानसभेसाठी राज्यपातळीवर युती होणार हे छातीठोकपणे सांगितले जात असले तरी शिवसेनेचे आमदार असलेल्या जागेवरही भाजपने मुलाखती घेतल्याने गतवेळीप्रमाणेच यावेळीही युती तुटण्याची शक्‍यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे. दहा-बारा दिवसांत आचारसंहिता लागणार हे स्पष्ट झालेले असतानाच युती न होण्याची शक्‍यता गृहीत धरून पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या तिकीटासाठी तीव्र स्पर्धा असली तरीही महेश लांडगे यांनाच तिकीट मिळेल, असे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे एक माजी आमदार यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. तर राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले आणखी एक नेते हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट मातोश्रीवरूनच पक्षप्रवेशाबाबत दूरध्वनी आल्याने भोसरी विधानसभेतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना गळ लावला असून यापैकी एकाचा प्रवेश निश्‍चित मानला जात आहे.

पिंपरी मतदारसंघातील एक राष्ट्रवादीचा बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर आहे. मात्र शिवसेनेतही सध्या इच्छुकांची भाऊगर्दी असून भाजपचे तब्बल सातजण या मतदारसंघातून तयारी करत आहेत. स्पर्धेच्या साठमारीत विजयी होण्याची शक्‍यता गृहीत धरून राष्ट्रवादीच्या या नेत्याला आयत्यावेळी शिवसेनेत प्रवेश देऊन तिकीट देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे शहरातील दोन बड्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शिवसेना प्रवेश निश्‍चित मानला जात असून गणेशोत्सवादरम्यानच हा प्रवेश होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत आणि आयाराम असा वाद उफाळला आहे. भाजपने उमेदवारीसाठी अद्यापपर्यंत तरी कोणाला आश्‍वस्त न केल्यामुळे सर्वच इच्छुकांनी गणरायाला साकडे घातले आहे. आता भाजप कोणाला संधी देणार यावरच या ठिकाणच्या पक्षांतराच्या उड्या ठरणार आहेत. राष्ट्रवादीकडून नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्‍वर भोंडवे, नाना काटे व मयूर कलाटे हे प्रमुख दावेदार आहेत. तर भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव पुढे आहे. मात्र आयत्यावेळी भाजपचे निष्ठावान समजले जाणारे सचिन पटवर्धन यांना पुढे करण्याची खेळी होण्याची चर्चा पक्षात रंगली आहे. याशिवाय उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक संदीप वाघेरे यांनीही स्पर्धेत उडी घेतली आहे. आयत्यावेळी घडामोडी घडल्यास मात्र सर्वाधिक पक्षांतर याठिकाणी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.