क्वाललांपुर – मलेशियात झालेल्या प्रचंड राजकीय उलथापालथी नंतर त्या देशाचे पंतप्रधान महाथिर महंमद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाथिर महंमद हे 94 वर्षांचे असून जगातील सर्वाधिक वयाचे राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांची गणना केली जात होती. त्यांच्या जागी त्यांचे वारसदार म्हणून अन्वर इब्राहीम यांची नियुक्ती केली जाणार होती पण सरकारच्याच घटक पक्षांनी इब्राहीम यांच्या नियुक्तीला आडकाठी करीत सरकारच पाडले आणि महाथिर महंमद यांना राजीनामा देणे भाग पाडले.
मलेशियात सन 2018 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात महाथिर महंमद यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार सत्तेवर आले. पण त्यांच्या आघाडीतच तीव्र मतभेद उफाळून आल्यानंतर हे सरकार गडगडले. त्यांच्या आघाडीतील नेत्यांनीच महाथिर महंमद यांनी नियुक्त केलेले त्यांचे राजकीय वारसदार अन्वर इब्राहीम यांना सरकार स्थापनेस विरोध केला. आता महाथिर महंमद यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि इब्राहीम यांना त्यांच्याच आघाडीच्या सदस्यांनी विरोध केल्यानंतर आता मलेशियात नेमके काय होणार याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.