ज्योतिरादित्य शिंदे यांचा कॉंग्रेसला रामराम
* कॉंग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा
* कमल नाथ सरकार धोक्यात
* सत्ता मिळण्याच्या भाजपच्या आशा पल्लवित
नवी दिल्ली : कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या मध्यप्रदेशात मंगळवारी मोठा राजकीय भूकंप घडला. तरूण आणि प्रभावी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यापाठोपाठ कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिला.
त्यामुळे मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अवघ्या पंधरा महिन्यांतच धोक्यात आले आहे. आता 49 वर्षीय ज्योतिरादित्य यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
त्या घडामोडींमुळे मध्यप्रदेशची सत्ता पुन्हा काबीज करण्याच्या भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मध्यप्रदेशातील राजकीय होळीने अचानकपणे रंगतदार वळण घेतले. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या ज्योतिरादित्य यांच्या निर्णयाने तो पक्ष हादरून गेला.
त्यातून सावरण्याचा प्रयत्न करताना कॉंग्रेसने प्रतिकात्मक कारवाई करताना ज्योतिरादित्य यांची पक्षातून हकालपट्टी केली. अर्थात, पुढील राजकीय वाटचालीचा बहुधा आधीच निर्णय घेतलेल्या ज्योतिरादित्य यांनी देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
आता माझ्यासाठी पुढे जाण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून निर्णय कळवला.
ज्योतिरादित्य यांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या आमदारांच्या राजीनाम्यामुळे मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकार अल्पमतात येणार आहे.
मध्यप्रदेश विधानसभेचे सध्याचे एकूण संख्याबळ 228 आहे. त्या विधानसभेत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारकडे काठावरचे बहुमत आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांसह कॉंग्रेसच संख्याबळ 114 आहे. सरकारला 4 अपक्षांनी आणि सप-बसपच्या मिळून 3 आमदारांनी पाठिंबा दिला आहे.
मात्र, ताज्या घडामोडींनंतर त्यातील काही आमदार भाजपच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या 107 आमदार आहेत. राजीनामा देणाऱ्या कॉंग्रेसच्या बहुतांश आमदारांनी सध्या भाजपशासित कर्नाटकमधील बंगळूरच्या रिसॉर्टमध्ये मुक्काम ठोकला आहे.
केंद्रीय मंत्रिपदी लागणार वर्णी?
ज्योतिरादित्य एक ते दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्या पक्षाकडून त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते. त्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत पाहता ज्योतिरादित्य यांचा भाजपप्रवेश 13 मार्चआधीच होण्याचे संकेत मिळत आहेत. ज्योतिरादित्य यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.