कर्नाटकात पुन्हा रंगणार राजकीय नाटक?

कॉंग्रेसकडून भाजप सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव

Madhuvan

बंगळुरू – कर्नाटकमधील भाजप सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याच्या हालचाली प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने सुरू केल्या आहेत. सत्तारूढ भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या खेळीने कर्नाटकात पुन्हा राजकीय नाटक रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सत्तारूढ भाजपमधील अंतर्गत कलह वाढीस लागला आहे. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांना हटवले जाऊ शकते, अशा आशयाच्या बातम्या अधूनमधून प्रसिद्ध होत आहेत.

त्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे भाजपकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, कॉंग्रेसने सरकारविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्याने उत्सुकता बळावली आहे.

कॉंग्रेसकडून अविश्‍वास ठराव मांडण्यासाठी देण्यात आलेली नोटीस विधानसभेच्या सभापतींनी स्वीकारली. आता पुढील दोन दिवसांत प्रत्यक्षात ठराव मांडला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय हालचाली वाढलेल्या दिसतील.

कॉंग्रेसचे पाऊल म्हणजे केवळ राजकीय नाटक आहे. त्या पक्षाकडे संख्याबळ नाही, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. कर्नाटक विधानसभेचे एकूण संख्याबळ 225 आहे. सत्तारूढ भाजपचे 116 सदस्य आहेत. त्यामुळे भाजपच्या सरकारला धोका नसल्याचे चित्र आहे.

मात्र, अविश्‍वास ठरावावर मतदान झाल्यास काही सत्तारूढ आमदारही सरकारविरोधात उभे राहतील, असा दावा कॉंग्रेसकडून केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.