पुण्यात राजकीय “दबंगगिरी’ राष्ट्रवादी-भाजपत शाब्दिक चकमक

पुणे –भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत, अजित पवारांसारखे 100 जण खिशात घेऊन फिरत असतात.’ असे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, या वक्तव्यांचा समाचार घेत; राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर, भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष पाटील
खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध केल्याप्रकरणी माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पाटील यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती. यावेळी “राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गृहमंत्रिपद देऊ नये, असा सल्ला मी उद्धव ठाकरे यांना दिला होता’ असा गौप्यस्फोट केला. याला धरूनच पहाटे जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र शपथ घेतली होती तेव्हा हाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला होता का? असा प्रश्‍न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, याची गरजच नव्हती कारण देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरेंसारखं काम नाहीये. राज्यात काय चाललंय याची माहितीदेखील उद्धव ठाकरे यांना नसते. शिवसेनेने सतत त्रास दिल्यानंतरही महाराष्ट्रात सलग पाच वर्षे ते मुख्यमंत्री राहिले आहेत. तेव्हादेखील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु देवेंद्र फडणवीस या सर्वांना पुरून उरले होते.

काय म्हणाल्या चाकणकर
चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी सोशल मीडियावर टीका केली आहे. त्यात, चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेल गोड स्वप्न आहे. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात निखळ मनोरंजन सुरू आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा. अशा शब्दांत ट्‌विटरवर खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले जगताप
भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते उपमुख्यमंत्र्यांबाबत हास्यास्पद वक्‍तव्य करत आहेत. राज्यातील सत्तेतून पाय उतार झाल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना उपचाराची गरज आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील हे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवीकरण करत असून उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या झटक्‍यातून ते सावरलेले नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.