सोशल मीडियावर राजेंची कॉलर, पाटलांच्या मिशा

राजेंसाठी “स्टाईल इज स्टाईल’, तर पाटलांसाठी “आमचं ठरलयं’

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापायला लागली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका आणि रॅली, कोपरासभा यांच्या माध्यमातून आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रान उठवले जात आहे. याचवेळी सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार उदयनराजे यांच्या कॉलर उडवण्याची स्टाईल आणि स्टाईल इज स्टाईल हा डायलॉग तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पिळदार मिशा आणि कोल्हापुराच्या राजकारणात सध्या खळबळ माजवणार आमचं ठरलयं या टॅग लाईनवर दोन्ही बाजुच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर घमासान सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे विरूद्ध शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. दोन्ही उमेदवारांचे समर्थक सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्या नेत्याच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहे. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रचारात उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाईल आणि नरेंद्र पाटील यांच्या पिळदार मिशा या प्रचाराच्या रणधुमाळीचा केंद्रबिंदू ठरला आहे. यातूनच दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकवर एकामेकांशी भिडताना दिसत आहेत. आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्याचा अधिकाधिक प्रचार व्हावा यासाठी अनेकांकडून प्रोफाइल पिक्‍चर आणि स्टेटसला आमचं ठरलयं आणि स्टाईल इज स्टाईल या टॅग लाईन ठेवल्या जात आहेत.

दरम्यान, एकंदरीत सातारा लोकसभा मतदारसंघात विकासाच्या मूद्दापेक्षा उदयनराजेंच्या स्टाईल आणि नरेंद्र पाटलांच्या पिळदार मिशा हेच सोशल मीडियावर प्रचाराचे मुख्य मुद्दे बनले आहेत. दरम्यान, निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरच उदयनराजेंची कॉलर टाईट राहणार की नरेंद्र पाटिल पिळदार मिशावर ताव मारणार यांचे चित्र स्पष्ट होईल परंतु, सोशल मीडियावरील हा प्रचाराचा अनोखा पॅटर्न मतदारांमध्ये चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.