दखल: कॉंग्रेससमोरील राजकीय आव्हाने

अशोक सुतार

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी 2014 च्या तुलनेत बरी झाली आहे असे दिसते. कॉंग्रेसला 52 जागांवर विजय मिळवता आला. गतवेळी कॉंग्रेसचे संसदेतील संख्याबळ 44 होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस दमदार कामगिरी करू शकेल, अशी अपेक्षा होती; परंतु दुसऱ्यांदा दारुण पराभवाशिवाय कॉंग्रेसच्या हाती काहीच आलेले नाही. भाजपने आपली मतांची संख्या मात्र पूर्वीच्या तुलनेत वाढवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व कौशल्य व भाषण करण्याचे कौशल्य होय.

भाजपच्या विजयाचा अन्वयार्थ काढायचा तर अनेक गोष्टींचा फायदा भाजपला झाला आहे. त्यांचे संघटन, व्यवस्थापन चांगले आहे. भाजपला अजून फारशी फुटीरतेची बाधा झालेली नाही. कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांतील शिलेदार सैरभैर झाले होते. आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत का, याबद्दलही विरोधी पक्षातील नेते संभ्रमात होते. सत्ता मिळेल तिकडे पळणे यामुळे विरोधी पक्ष गोत्यात आले आहेत. राजकारण आपले सत्व विसरून करावे, हे यांच्या गावीही नाही, इथपर्यंत अनेक पक्षांतील नेत्यांची मजल गेली. अशा अस्थिर मनाच्या शिलेदारांना जनतेने लोकसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला आहे. काही राज्यात कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही, अशी बिकट स्थिती आहे.

राहुल गांधी यांनी अशा संकटसमयी कॉंग्रेसला एकटे सोडून देण्याचा चालवलेला प्रयत्न बरा नव्हे. त्यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर राहणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. जहाज तुफान वादळात फसावे आणि जहाजाच्या कप्तानाने आपण आता काहीच करू शकत नाही, असे हताश उद्‌गार काढल्यानंतर प्रवाशांची परिस्थिती काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. ती मोदी त्सुनामीमुळे की राजकीय न्यूनगंडामुळे की अन्य काही कारणांमुळे, हे त्यांनाच माहीत! यामुळे पक्षातील अनेक नेत्यांची मनःस्थिती खालावली जाणार आहे. राजकारणात हार-जीत सुरू राहते, त्यामुळे राहुल गांधी यांनी खचून न जाता कॉंग्रेसमध्ये प्राण आणण्याचे प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे. अन्यथा पक्षात फुटीची साथ येणार आहे. ती येणे कॉंग्रेसच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे.

लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाचा प्रतिकूल परिणाम कॉंग्रेस व विरोधी पक्षांच्या मानसिकतेवर झालेला दिसत आहे. या निकालावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक नुकतीच घेण्यात आली होती. या बैठकीत कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी उपस्थित होते. राहुल यांच्या नेतृत्वात पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचा मानसिक परिणाम राहुल गांधी यांच्या निर्णयक्षमतेवर झाला असण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीमुळे कॉंग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले असले तरी माघार घेऊन, राजीनामे देऊन कॉंग्रेसला लागलेले पराभवाचे ग्रहण सुटणार नाही. त्यासाठी पक्षात नवी राजकीय नीती, विचार ठरवणे महत्त्वाचे आहे.

कॉंग्रेसच्या देशभरातील पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनामास्त्र सुरू झाले. मणिपूरमधील कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी मणिपूर कॉंग्रेस कमिटीतील त्यांच्याकडे असलेल्या विविध पदांचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पक्षाकडे राजीनामे सोपवत, आम्ही कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे अनुकरण करत असल्याचे सांगितले आहे. मणिपूर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गैखंगम यांच्याकडे पक्षाच्या आमदारांनी राजीनामे सोपवले आहेत. अशाप्रकारे राहुल गांधी यांनी घेतलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा परिणाम देशातील कॉंग्रेसच्या इतर नेत्यांवर होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला देशभरात मिळालेल्या अपयशानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारत स्वतःच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. मात्र, कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचा राजीनामा फेटाळण्यात आला होता.

कॉंग्रेसच्या नऊ माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला. अमेठीत कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा न भूतो न भविष्यति पराभव झाला. अमेठी लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तिथे पक्षाचा पराभव झाल्यामुळे त्यावर विचारमंथन होणे आवश्‍यक आहे. अमेठी मतदारसंघात प्रियांका गांधी यांनी अनेक दौरे केले होते. परंतु मतदारांनी कॉंग्रेसला का नाकारले यावर चिंतन होण्याची आवश्‍यकता आहे. कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी पुन्हा जनाधार मिळविणे गरजेचे आहे. प्रियांकांचे संवादकौशल्य चांगले आहे. ममता बॅनर्जी, शरद पवार, जगनमोहन रेड्डी यांच्याशी योग्य संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार व राहुल गांधी यांच्यात चर्चा होऊन नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गतवेळी विरोधी पक्ष अस्तित्वात नव्हता, तेवढे संख्याबळ कॉंग्रेसजवळ नव्हते. यावेळीही अशीच बिकट स्थिती कॉंग्रेससमोर आहे.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष व कॉंग्रेस पक्ष एकत्र आले तर विरोधी पक्ष तयार होण्यासाठी आवश्‍यक म्हणजे 56 चे संख्याबळ तयार होईल. कारण विरोधी पक्ष अस्तित्वात असेल तर सरकारला विरोध करणारा व लोकांची बाजू मांडणारा एक आधार तयार होईल. लोकशाहीत या आधाराला लोकांच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. कॉंग्रेस इतर पक्षांसोबत कसा संवाद साधणार आणि कौशल्याने आगामी राजकारणाचे पट कसे मांडणार यावर सर्व काही अवलंबून आहे. इतर पक्षांशी समन्वय साधून जनतेची विकासकामे सरकारकडून कशी करून घेता येतील, यावर कॉंग्रेसचे अस्तित्व अवलंबून असणार आहे. हे कॉंग्रेसला जमेल काय? त्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेऊन विरोधी पक्षांची मोठी आघाडी तयार केली पाहिजे. परंतु असे होण्यासाठी विरोधकांमध्ये एकजूट पाहिजे. संसदेत किंवा संसदेच्या बाहेर या तडजोडी कॉंग्रेसला कराव्या लागतील.

लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभव आणि पक्षनेतृत्वाचा अस्थिरपणा अशा दुहेरी संकटात सापडलेल्या कॉंग्रेसने पुढील महिनाभर वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत नेत्यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. कॉंग्रेसने आता विरोधी पक्षपदाला प्राप्त व्हायचे असेल तर राष्ट्रवादी वा अन्य पक्षांशी तडजोड करून राजकीय लवचिकता दाखवली पाहिजे. विरोधी पक्ष सरकारच्या कामकाजावर, धोरणांवर प्रश्‍न उपस्थित करून त्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवू शकतो. कॉंग्रेससमोर अशी विविध आव्हाने आहेत. कॉंग्रेस नेतृत्व राजकीय डावपेच कसे हाताळणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.