जुन्नर – काही आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील ज्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे, तेथे पालकमंत्र्यांचा सल्ला घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक नेमावा, असे आदेश काढले होते. अशा मुदत संपणाऱ्या 67 ग्रामपंचायती जुन्नर तालुक्यात आहेत. त्यामुळे आता याठिकाणी प्रशासक म्हणून शासकीय व्यक्तीची नेमणूक होणार की राजकीय कार्यकर्त्यांचे राज्य चालणार, ही चर्चा सर्वत्र सुरू आहे.
या निर्णयाविरोधात राज्यात विविध ठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या ग्रामविकास खात्याच्या निर्णयामुळे गावातील पुढारी, नेते बाशिंग बांधून तयार झाले आहेत. जणू गावाचा गाडा म्याचं हाकणार, या अविर्भावात पारावर बैठका आणि शेतात पार्ट्या झडत आहेत. परंतु राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस असे तिघाडी सरकार असल्याने गावांत नक्की बाजी कोण मारणार, यावरून वातावरण गढूळ होत आहे.
या प्रशासकाच्या पात्रतेसाठी आणि नेमणुकीसाठी नेमके निकष व अटी न दिल्यामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण असल्याची टीका जुन्नर भाजप अध्यक्ष संतोष तांबे यांनी केली आहे. तसेच राजकीय किंवा मर्जीतील व्यक्ती प्रशासक म्हणून नेमण्यात आला तर ग्रामीण विकासासाठी निर्माण करण्यात आलेल्या त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांच्या इतिहासातला हा सर्वात वाईट निर्णय असेल, अशी टीका जुन्नर भाजप सरचिटणीस प्रशांत पाबळे यांनी केली आहे.
तर करोना संसर्गाचा कालावधी अनिश्चित असल्याने विद्यमान ग्रामपंचायत मंडळास मुदतवाढ दिल्यास गावातील विकासाची प्रक्रिया निरंतर सुरू राहू शकते तसेच करोना संसर्ग रोखण्याचे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकते, असे मत ठिकेकरवाडीचे आदर्श सरपंच संतोष ठिकेकर यांनी व्यक्त केले आहे.
या आहेत 65 ग्रामपंचायती –
ओतूर, रोहकडी, काटेडे, विठ्ठलवाडी, अहिनवेवाडी, आलमे, आर्वी, बेलसर, भोरवाडी, धामणखेल, डिंगोरे, गोळेगाव, गुंजाळवाडी, हिवरे बुद्रुक, हिवरे तर्फे नारायणगाव, जाधववाडी, खामुंडी, खानापूर, खिल्लारवाडी, खोडद, कोळवाडी, कुमशेत, कुसुर, मंगरूळ, नळावणे, नेतवड, निमगाव सावा, पेमदरा, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, राजुरी, तेजेवाडी, उंचखडक, वडज, येणेरे, औरंगपूर, पिंपळगाव सिद्धनाथ, संतवाडी, आळे, बल्लाळवाडी, बोरी बुद्रुक, चिंचोली, धोलवड, कुरण, निमदरी, निमगाव तर्फे म्हाळुंगे, ओझर 1 व 2, शिंदेवाडी, शिरोली बु., ठिकेकरवाडी, उदापुर, वडगाव कांदळी, अलदरे, बोरी बु., हिवरे खुर्द, मांजरवाडी, निरगुडे, पिंपरीपेंढार, वडगाव सहानी, आगर, मांदारणे, वारूळवाडी, धालेवाडी तर्फे हवेली यांचा समावेश आहे. तर 7 नोव्हेंबरला बस्ती, धनगरवाडी, शिरोली खुर्द व येडगाव.