पॅरिस – जगभरात फैलावलेल्या करोनाबाधेमुळे जगातील पोलिओ लसीकरण मोहीम मात्र थंडावली आहे. ही मोहीम थंडावण्याचा गेल्या तीन दशकातील हा पहिलाच प्रकार आहे. जागतिक पोलिओ निमुर्लन संस्थेने म्हटले आहे की, करोनामुळे विविध देशांनी जे निर्बंध आपल्या देशांमध्ये लागू केले आहेत त्यामुळे आमचे आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी जनतेपर्यंत पोहचू शकत नाहीत.
त्यामुळे ठिकठिकाणची ही मोहीम थांबवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी व पोलिओ निर्मूलन मोहिमेचे प्रमुख मायकेल जफरान यांनी म्हटले आहे की जगातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी आम्ही कसोशिने प्रयत्न करीत असताना त्यात ही नवीन बाधा आली आहे. पोलिओ लसीकरण मोहीम थांबवण्याची वेळ आमच्यावर या आधी कधीच आली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. जगातील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोनच देशांमध्ये पोलिओ लसीकरणाचे मोठे काम बाकी राहिले आहे.