खळबळजनक ! विधानसभेच्या गेटसमोर गोळी झाडून PSIची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

लखनऊ – उत्तरप्रदेशात विधानसभेच्या गेटसमोर पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निर्मल कुमार चौबे (वय-53) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे.

माहितीनुसार, विधान भवनच्या सात नंबर गेटसमोर पार्कींगमध्ये कर्तव्यावर असताना चौबे यांनी सर्व्हिस रिव्हाॅल्वरमधून छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेनंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी मृत घोषीत केले. चौबे यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे. आजारामुळे त्रस्त असल्याने आत्महत्या करत असल्याचे नोट मध्ये लिहिले आहे.

पोलीस आयुक्त डीके ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मल कुमार बंथरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी विधानभवनच्या ड्यूटीवर होते. दुपारी 3 वाजता ते गेट नंबर 7 च्या पार्कींगजवळ होते. अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर जवळील लोकांनी त्यांना पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. तातडीने उपचारासाठी रुग्णालायत दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. त्यात चौबे यांनी स्वत: गोळी झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावर सर्व्हिस रिव्हाॅल्वर आणि काडतूस मिळाले आहे. पोलीस तपास करत आहेत.

निर्मल चौबे हे वाराणसीतील पलही पट्टी येथील रहिवाशी होते. त्यांच्यामागे आई, तीन भाऊ, दोन मुले, सुन असा परिवार आहे. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

मृत चौबे यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिले आहे. ‘आजारामुळे त्रस्त आहे. आता जगण्याची इच्छा राहिली नाहीए. तुम्हाला एक विनंती आहे, माझ्या मुलांची काळजी घ्या.’ पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून फाॅरेंसिक तपासासाठी पाठवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.