घराजवळील दुकानातील वस्तूंचे ऑनलाइन बुकिंग करता येणार : गर्दी टाळण्याचे प्रयत्न
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचाबंदीमुळे शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. याचेच निमित्त साधत अनेक पुणेकर घराबाहेर पडत असल्याने, आता शहर पोलिसांनी “सेवा’ उपाक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या वस्तूंचे “बुकिंग’ करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाला आळा घालण्यासाठी शहरामध्ये संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने, नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे पालन करण्याऐवजी उल्लंघन होत आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
यावर उपाय म्हणून पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतून आणि वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या निरीक्षणाखाली “सेवा प्लस (हॅशटॅग) डूयिंग मोअर’ या उपक्रमांतर्गत पुणे शहर पोलीस आणि लोकिव्ह इनिशिएटीव्हच्या संस्थापक नवरेशम कौर यांच्या वतीने “डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. लोकिव्ह. कॉम’ ही वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. यामुळे मोबाइलद्वारे नागरिक घसबसल्या आवश्यक असणाऱ्या वस्तुंची “ऑर्डर’ देऊ शकणार आहेत.
ही योजना संपूर्ण शहरामध्ये राबवण्यात येणार असून, यामध्ये जितके दुकानदार सामील होतील. त्याप्रमाणे सेवा देणे अत्यंत उपयुक्त होणार असून, करोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दुकानात गर्दी करण्यापेक्षा या सेवेचा फायदा नागरिकांनी घ्यावा, असे शिंदे यांनी सांगितले.
असे करता येणार बुकिंग
राहत्या ठिकाणाच्या दोन किलोमीटर परिसरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचे पर्याय नागरिकांसाठी खुले असणार आहेत. या यादीतील “ग्रीन स्टार्स’ने असणाऱ्या दुकानांच्या पर्यायावर “क्लिक’ करून ग्राहक संबंधित दुकानदारास अत्यावश्यक वस्तुंची मागणी करू शकणार आहेत. ग्राहकांनी मागवलेल्या वस्तूंचे “पॅकिंग’ झाल्यानंतर ग्राहकांनी दुकानदारांकडून वस्तू नेण्यासाठी संपर्क साधण्यात येणार आहे. यामुळे दुकानातील गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. याबाबत काही शंका असल्यास 1800-572-6186 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.