सातारा – मुंबई पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या पोलिसाच्या दुचाकीचे चाक व बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना साताऱ्यात घडली. सुनील सीताराम निकम (वय 47, सध्या रा. मुंबई मूळ रा.कोडोली, सातारा) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सुनील निकम सध्या मुंबई पोलिस दलात कार्यरत असून, ते मुळचे साताऱ्यातील आहेत. आजारी असल्याने ते कोडोली येथे आले होते.
याठिकाणी ते दुचाकी (जीजे 06- बी 3702) वापरत होते. दि. 23 जुलै रोजी रात्री कोडोली येथील ते राहत असलेल्या अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली होती. सकाळी त्यांनी पाहिल्यानंतर दुचाकीचे पुढील चाक व बॅटरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही दुचाकीचे चाक व बॅटरी सापडत नसल्याने सुनील निकम यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घटनेबाबत सांगितल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुध्द 2800 रुपये किंमतीचे दुचाकीचे चाक व बॅटरी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.