‘मी ऐश केली’; लोकांना ठकवणाऱ्या महिलेच्या उत्तराने पोलिसही झाले चकित

महाबळेश्‍वर – घरकुलसह अन्य सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या मंगल मोरे या महिलेने चौकशीत दिलेल्या उत्तरामुळे पोलिसांवर चकित होण्याची वेळ आली. लोकांना फसवून मिळवलेल्या लाखो रुपयांचे काय केले, असे विचारले असता, “मी ऐश केली,’ असे उत्तर तिने दिले.

मंगल मोरे हिच्याविरोधात तक्रार करण्यासाठी अनेकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अटकेनंतर मंगल मोरेची प्रकृती बिघडली. “समाजसेविका’ अशी प्रतिमा तयार करून मंगल मोरे हिने महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई व तापोळा येथील लोकांना सावज केले. आपली जाहिरात होण्यासाठी तिने कथित बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी सहली आयोजित केल्या होत्या. या महिला मंगल मोरेसाठी “गिऱ्हाईकांना’ आकर्षित करण्यात मदत करत होत्या.

एकदा सावज टिपल्यावर त्याची खात्री पटण्यासाठी मंगल हिने रोख रक्‍कम घेतानाच संबंधिताचे कागदपत्रे व फोटो घेत होती. त्यामुळे तिच्या घरात फायलींचे गठ्ठे सापडले आहेत. “आपल्याला एक मुलगा असून तो पुण्यात जीम ट्रेनर आहे. त्याला दोन वर्षात कधीच भेटले नाही,’ अशी माहिती तिने पोलिसांना दिली आहे. लोकांकडून पैसे घेतल्यानंतर तिने कोणालाही त्याची पावती दिलेली नाही, असेही समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.