मावळात पर्यटनासाठी येणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश
लोणावळा – स्वातंत्र्यदिन आणि जोडून आलेला रविवार या सलग सुट्ट्यांमुळे मावळात पर्यटकांनी होण्याची शक्यता पाहून प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घेतली आहे. पर्यटनासाठी विनापरवाना लोणावळा अथवा मावळ तालुक्यातील अन्य पर्यटनस्थळांवर प्रवेश केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कॉंवत यांनी दिले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांवर जाण्यास यावर्षी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही आदेश धुडकावून पोलिसांची नजर चुकवून याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 300 पर्यटकांवर लोणावळ शहरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई, पुण्यासह आता मावळ तालुका व लोणावळा शहरात देखील दैनंदिन करोना रुग्ण आढळू लागले आहेत. शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यात आले असले तरी जिल्हाबंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्याहून तसेच अन्य जिल्हे व राज्यांमधून लोणावळ्यात येताना विनापरवाना आलात तर चेकपोस्ट नाक्यावरूनच पुन्हा माघारी जावे लागणार आहे. यानंतरही कोणी पर्यटनस्थळांपर्यत जाण्याचा प्रयत्न केला अथवा तसे आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांन्वे संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, लोणावळा ग्रामीणचे संदीप घोरपडे, कामशेत पोलीस ठाण्याचे विठ्ठल दबडे, वडगाव मावळचे सुरेश निंबाळकर या सर्व अधिकाऱ्यांना आपआपल्या कार्यक्षेत्रात शनिवार व रविवारी नाकाबंदी लावली पर्यटनस्थळे बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईच्या दिशेने विनापास येणारी वाहने रोखण्यासाठी खालापूर टोलनाका, खंडाळा, रायवूड व नौसेना बाग येथे चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. तर ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोलनाका, कार्ला-मळवली रस्ता, पवनानगर येथे बंदोबस्त नेमला आहे. कामशेत व वडगाव पोलिसांनी नाणे मावळ व आंदर मावळ भागातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर चेकपोस्ट लावले आहेत.