पिंपरी – चिंचवडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेच पैशांसाठी आपल्या पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून 5 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडला आहे.
पोलीस शिपाई नितीन विठ्ठल राठोड, सासू शांताबाई विठ्ठल राठोड, सासरा विठ्ठल फुलाजी राठोड (तिघे रा. चिंचवडेनगर, चिंचवड), नणंद नीलम श्रीकांत चव्हाण (रा. कर्जत, रायगड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नितीन राठोड हे पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस कर्मचारी म्हणून नेमणुकीस आहेत. त्यांनी पत्नीला पैशांसाठी शिवीगाळ करून मारहाण केली. सासूने माहेरच्यांकडून फ्लॅट घेण्यासाठी पैसे घेऊन येण्याची मागणी केली. सासऱ्याने दारू पिऊन येऊन विवाहितेला शिवीगाळ केली.
नणंदेने विवाहितेला घरातून हाकलून देण्यासाठी पती आणि सासूला भडकावले. याबाबत विवाहितेच्या आई, वडील, भाऊ आणि नातेवाइकांनी दोन वेळा चिंचवडेनगर येथे बैठक घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीन राठोड याने सासरच्या लोकांना उलटसुलट बोलून हाकलून दिले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.