भोर (दीपक येडवे) – उत्रौली (ता. भोर) गावातील परिवारातील सदस्यांनी शिक्षक व पोलीस दलात सेवा करण्याचा पर्याय निवडल्याने या गावामधील सर्वच परिवारांमध्ये देशाबद्दलची कर्तव्यदक्षता दिसून येते उच्चशिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा गावातील प्रत्येक तरुण-तरुणीने उराशी बाळगलेली आहे.
शिक्षक आणि पोलीस अशा कर्तव्यदक्ष क्षेत्रात घरटी एक व्यक्ती असणारे उत्रौली (ता. भोर) गाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कै. मारुती येडवे, कै. रघुनाथ होनप हे येथे विद्यादानाचे कार्य करीत होते.
या शिक्षणाचा वारसा घेऊन भोर तालुक्याचे प्रथम सभापती कै. शंकरराव शिवतरे यांच्या दूरदृष्टीने समाज शिकला पाहिजे या हेतूने तत्कालीन परिस्थितीत शिक्षकांचा तुटवडा असल्याने शिक्षणांची आवड असणाऱ्या गावातील तरुणांना शिक्षकी पेशात भरती करण्यात आले.
याबरोबरच पोलीस दलात कार्यरत असलेले कै. बळीबा शेटे हे पोलीस भरतीसाठी गावातील तरुणांची पोलीस भरती होईल यासाठी तरुणांची भरतीसाठी तयारी करून घेत असत. आज गावात राहणाऱ्या प्रत्येक परिवारातील किमान एक तरी सदस्य शिक्षक किंवा पोलीस दलात कार्यरत आहे. या गावातील बहुतेक सर्व शिक्षक मंडळी केवळ भोर तालुक्यात नव्हे तर तर संपूर्ण महाराष्ट्र निरनिराळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तसेच अमेरिकेतील आर्कांसा विद्यापीठात संशोधन सहायक प्राध्यापक म्हणून कार्यत आहेत. उत्रौलीने या दृष्टीने सामाजिक वसा जपला आहे.
225 जण पोलीस क्षेत्रात कार्यरत
या गावातील 225 व्यक्ती पोलीस क्षेत्रात कार्यरत आहेत. यापैकी 3 पीआय कै. जनार्दन सांळुके, कै. अर्जुन लेकावळे, अमृत शिवतरे 3 एपीआय, 10 पीएसआय, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी, 3 केंद्र प्रमुख, 20 मुख्याध्यापक आहेत.