78 संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची जादा कुमक

शिरूर, मावळ मतदारसंघात पोलीस प्रशासन अलर्ट : सीसीटीव्ही कार्यान्वित होणार

पुणे – निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात संवेदनशील अशा मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांत 78 मतदान केंद्र संवेदनशील असून या केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्‍त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र असण्याचे प्रमाण कमी आहे. यादीमध्ये मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांचे प्रमाण जास्त आहे. ज्या मतदान केंद्रावर यापूर्वी 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. तसेच या ठिकाणी एकाच उमेदवाराला 75 टक्‍के मतदान मिळाले आहे. मतदान केंद्रावर गोंधळ, भांडणे, गैरप्रकार किंवा वारंवार एकाच मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड होणे आदी निकषांच्या आधारे जिल्हा प्रशासन व पोलिस अधिकारी संवेदनशील मतदान केंद्र ठरवितात.

शिरूर लोकसभा मतदारसंघात 2 हजार 296 मतदान केंद्रे आहेत. यातील 31 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तर मावळ लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या ठिकाणी 1 हजार 238 मतदान केंद्र असून यातील 47 मतदान केंद्र संवेदनशील आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा नियंत्रण कक्ष ऍटॅच
दोन्ही लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षात केले जाणार आहे. त्याचबरोबर निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरही ही मतदान केंद्र पाहता येणार आहे. या मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरिक्षकही नेमले जाणार आहे. हे निरिक्षक केंद्र शासनातील अधिकारी असणार असून ते या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here