बेंगळुरू – एका खाजगी फर्मद्वारे करण्यात आलेली मतदार डेटा चोरी आणि मतदार याद्यांतील फेरबदल प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या दोन आयएएस अधिकाऱ्यांना पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, के श्रीनिवास आणि एस रंगप्पा या दोन निलंबीत अधिकाऱ्यांना आज तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते मात्र, त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली आहे.
श्रीनिवास हे बेंगळुरू शहरी जिल्ह्याचे उपायुक्त होते आणि रंगप्पा हे ब्रुहत बेंगळुरू महानगरपालिकेचे अधिकारीहोते, जेव्हा मतदार डेटा चोरीचे प्रकरण झाले त्यावेळी ते अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करीत होते. 26 नोव्हेंबर रोजी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारण ते त्या मतदारसंघांचे प्रभारी होते ज्यात मोठ्या प्रमाणात निवडणूक डेटा फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
Drone Yatra : भारत ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल – केंद्रीय मंत्री ठाकूर
निवडणूक आयोगाने शिवाजी नगर, चिकपेट आणि महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील नावांमध्ये फेरबदल करण्याच्या प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. कर्नाटकातील या ठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे फेरबदल करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला होता. हे काम ज्या संस्थेद्वारे करण्यात आले आहे त्या संस्थेच्या प्रमुखालाही पोलिसांनी अटक केली आहे.