पुणे ग्रामीणचे पोलीस कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत

– राजेंद्र काळभोर

लोणी काळभोर – पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार जून महिन्याची 19 तारीख उजाडली तरी झाला नसल्याने जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा झाली असल्यामुळे ग्रामीण पोलीस कर्मचारी वेतनापासून वंचित राहत आहेत. शाळा, महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात एकूण 31 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. ही सर्व पोलीस ठाणी व सर्व विशेष विभागात मिळून एकूण साधारण 3 हजार कर्मचारी काम करीत आहेत. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 1 किंवा 2 तारखेला बॅंकेतील खात्यावर जमा होतो. या महिन्यात मात्र, 19 जून उजाडला तरी पगार जमा झालेला नाही. सध्या जून महिना सुरू असून शाळा, महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. दरवर्षी जून महिना आला की पालकांच्या पोटात गोळा येतो. शाळा महाविद्यालयांचे ऍडमिशन, नवीन वह्या, पुस्तके, गणवेश, बूट – मोजे आदी वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामुळे पालक धास्तावलेले असतात. अशा परिस्थितीत जून महिना निम्म्यापेक्षा जास्त संपला तरी अजून ही मे महिन्याचा पगारच झालेला नाही. त्यामुळे ग्रामीणचे कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

पुणे शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांना दोन पगारही मिळाले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस दल हे नव्याने तयार करण्यात आले आहे. ग्रामीण व पुणे शहरातील काही भाग पिंपरीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तेथील कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनवाढ देऊन पगार करण्यात आला आहे. मात्र, पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू करण्यात आलेला नाही. मे महिन्याचा पगार सातव्या किंवा सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार द्या. परंतु आहे तो पगार तरी लवकर द्या, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. इतर कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी संप करता येतो. संघटना तयार करता येते. पोलिसांच्या नशीबात मात्र, हा अधिकार नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयातील झारीतील काही शुक्राचार्य त्यांची अडवणूक करीत आहेत. त्याला पोलीस व त्यांचे कुटुंबीय बळी पडत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.