जयपूर – राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील सरवार गावातील एका दर्ग्यात धार्मिक कार्यक्रमासाठी जे शंभर लोक जमले होते त्यांना पोलिसांनी आज बळाचा वापरू करून हुसकाऊन लावले आहे.
लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग केल्याच्या आरोपातून त्यातील सहा प्रमुखांना पोलिसांनी अटकही केली आहे. येथील प्रथेनुसार दरवर्षी अजमेर येथील सुफी संत मोईनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्याच्या खादिमांकडून सरवार येथील दर्ग्याला चादर अर्पण केली जाते त्या कार्यक्रमासाठी हे लोक तिथे जमले होते.
दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील मशिदीत धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या अनेक जणांना करोनाची बाधा झाल्याने या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राजस्तानातील लोकांना हुडकून काढण्याचे काम पोलिस करीत असतानाच सरवार येथे हा प्रकार घडला आहे.
सरवार येथील घटनेच्या संबंधात माहिती देताना अजमेरचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुवॅंर राष्ट्रदीप यांनी सांगितले की, तेथील वार्षिक कार्यक्रमासाठी पोलिसांनी पाच जणांनाच उपस्थित राहण्याची अनुमती दिली होती. पण नंतर तेथे अनेक जण जमले होते. त्यांना तेथून निघून जाण्याची सूचना पोलिसांनी केल्यानंतर उपस्थितांनी पोलिसांशीच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र सोैम्य लाठीमार करावा लागला. या प्रकरणी त्यांनी सहा जणांना अटक केली आहे.