बंगळुरू – सिनेमाच्या चित्रिकरंणासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन हजाराच्या बानावट नोटा देऊन 500 किलो अंमली पदार्थ पोलिसांनीच खरेदी केले. त्यानंतर ते विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या या फिल्मी स्टाईल कारवाईने देशातील या वर्षीचे सर्वात मोठे अंमली पदार्थाचे रॅकेट उद्ध्वस्त झाले.
चित्रपटाच्या एका स्टूडिओतून 500 किलो गांजा खरेदी करण्याचे ठरवले. त्यासाठी चित्रपटात वापरतात तशा बनावट नोटाही दिल्या. या नोटा खऱ्या दोन हजाराच्या नोटांसारख्याच दिसत असल्या तरी त्याचा सिरियल नंबर एकच आहे. पण, या पैशाला हे तस्कर भुलतील का? याबाबत सुरवातीला साशंकच होतो, असे या कारवाईत भाग घेतलेल्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
बंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी या करवाईवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना व्हाईटफिल्ड विभागात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे या भागावर लक्ष केंद्रीत करून तपास करण्याच्या सुचना दिल्या. त्यावेळी काही पेडलर्सना त्यांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या मूळ तस्करापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. त्यामुळे काही साध्या वेशातील पोलिसांना या सप्लायरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या पेडलर्सवर सोपवली.
पोलिसांची ओळख त्यांनी संभाव्य मोठे ग्राहक अशी करून दिली. पहिल्या भेटीत तुम्हाला किती गांजा खरेदी करायचे आहे, असे त्याने विचारले. त्यावेळी पोलिसांनी एक टन खरेदी करायची तयारी आहे. पैशाचा काही प्रॉब्लेम नाही, असे त्याला सांगितले. त्याने त्यावेळी पैसे दाखवा मग पुढे बोलू असे सांगितले, अशी पुस्ती पंत यांनी जोडली.
पुढच्या बैठकीत पैसे दाखवण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र पोलिसांकडे एक कोटी रुपयांची तरतूद नव्हती. शिवाय त्याच्या सुरक्षेचाही प्रश्न होताच. त्यामुळे आम्ही बंगळुरूमधील फिल्म स्टुडिओशी संपर्क साधला. त्यांना एक कोटी रुपयांच्या खोट्या नोटा देण्याची विनंती केली. म्हणजे या नोटा खऱ्या नोटांसारख्या दिसतात. पण त्याला काहीच किंमत नसते, असे या कारवाईत भाग घेतलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दुसऱ्या बैठकीत एका चॉकलेटी रंगाच्या सुटकेसमधून भरून नेलेल्या या नोटा त्या पुरवठादाराला दाखवण्यात आल्या. या नोटा तो बारकाईने पाहतो काय ही आमची खरी काळजी होती. कारण या सर्व नोटांचा सिरीयल क्रमांक एकच होता. मात्र ही बैठक सुरळीत पार पडली. त्यानंतर त्याने 500 किलो गांजा आणण्याचे मान्य केले, असे पंत यांनी सांगितले.
या बैठकीनंतर मंगळवारी गांजा घेऊन एक ट्रक बंगळुरूमध्ये दाखल झाला. हा स्वीकारण्यासाठी के. आर पुरम भागात बैठक ठरवण्यात आली. कारण गांजा कसा आणला हे सुध्दा आमच्यासाठी महत्वाचे होते. ड्रायव्हरच्या सीटमागे एक छुपा कप्पा बनवण्यात आला होता. त्यात गांजा ठेवण्यात आला. अन्य ट्रकमध्ये इतर सामान भरण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी बंद ठिकाणी हा माल उतरवून घेऊ, असे त्यांना पटवले. त्यांना केआर पुरममधील एका गोदामात बोलावले. एकदा ते तेथे आल्यानंतर पोलिसांनी आपले खरे स्वरूप दाखवत माल आणि तस्करांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये दयाल राम (वय 38), पूना राम (वय 24) आणि बुधा राम (वय 23) यांचा समावेश आहे. ते सर्व राजस्थानचे रहिवासी आहेत. तयांच्या अन्य साथिदारांचा शोध सुरू आहे, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.