रायपूर -छत्तिसगढ पोलिसांनी बनावट टूलकिट प्रकरणी याआधीच गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात पोलिसांनी सोमवारी त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते रमण सिंह यांचा जबाब नोंदवला.
सोशल मीडियावरील एका टूलकिटवरून सध्या राजकारण तापले आहे. कॉंग्रेसने आपल्या लेटरहेडचा वापर करून बनावट टूलकिट सर्क्युलेट करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यावरून कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने रमण सिंह आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
त्याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी सिंह यांना याआधीच नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार, सिंह यांचा लेखी जबाब नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिंह यांनी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया म्हणजे कॉंग्रेसचे कारस्थान असल्याचा आरोप केला.
छत्तिसगढमधील पोलीस कायद्याच्या आधारे नव्हे; तर राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसच्या निर्देशांवरून कृती करत आहेत. मला पोलिसांची नोटीस मिळण्याआधीच ती कॉंग्रेसने ट्विटरवरून प्रसिद्ध केली, असा दावा त्यांनी केला.