झेंडीगेट परिसरात सहा कत्तलखान्यांवर पोलिसांचे छापे

73 गोवंश जनावरांची सुटका ;12 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त
नगर (प्रतिनिधी) –
शहरातील झेंडीगेट परिसरात सहा ठिकाणी सुरू असलेल्या कत्तल खान्यावर शहर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्या दरम्यान 73 जिवंत गोवंश जातीचे जनावरांची सुटका करण्यात शहर पोलिसांना यश आले असून, एकुण 12 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री साडेअकरा वाजता शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कत्तलखाने चालविणारे अमन बाबु शेख (रा. भूषणनगर, केडगाव), अदली इक्‍बाल कुरेशी, रिजवान मुस्ताक शेख (दोघे रा. बाबा बंगाली, झेंडीगेट), सलिम अकबर चौधरी (रा. तापकीर गल्ली, नगर), नजीर अहमद शब्बीर कुरेशी, बबलु इस्माईल कुरेशी, फिरोज समशेर शेख (तिघे रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट) यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम, प्राणी क्‍लेश प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झेंडीगेट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आलेली आहे. काही जनावरांची कत्तल करून मांसाची विक्री करण्यात येत आहे. अशी, माहिती उपअधीक्षक मिटके यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. या माहितीनुसार उपअधीक्षक मिटके यांच्या पथकाने शनिवारी रात्री साडेअकरा ते पहाटे तीन दरम्यान झेंडीगेट परिसरातील सहा कत्तल खान्यावर छापे टाकले. बाबा बंगाली येथील तीन ठिकाणी बंदिस्त शेडमध्ये, जुन्या तालुका पोलीस ठाण्यासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये, झेंडीगेट परिसरात उभा असलेल्या एका टेम्पो (क्र. एमएच- 16 ऐवाय- 6788) व कुरेशी मज्जीद समोरील एका रूममध्ये पोलिसांनी हे छापे टाकले. या छाप्यात 73 जिवंत गोवंश जनावरे, 500 किलो गोमांस, एक टेम्पो, कुर्हाड, चाकू, सत्तुर असा 12 लाख 86 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एन.पवार, पोलीस उपनिरीक्षक सतीष शिरसाठ, उपनिरीक्षक कचरे, प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक महाले, आरसीपीचे कर्मचारी यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.