फलटणमध्ये सात दुकानांवर पोलिसांची कारवाई

मास्क न वापरणाऱ्या 60 नागरिकांना दंड

फलटण – सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने चार दुकाने सात दिवसांसाठी बंद ठेवण्याची कारवाई फलटण शहरात करण्यात आली. त्याचबरोबर मास्कचा वापर न करणाऱ्या 60 जणांना आणि एका बॅंकेच्या शाखेला दंड ठोठावण्यात आला. नगरपरिषद, महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाप्रमाणे प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्‍त मोहीम राबवून सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर आणि मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. अरविंद क्‍लॉथ सेंटर, सम्राट इलेक्‍ट्रॉनिक्‍स, सुरभी टी सेंटर, सन्मती ट्रेडर्स किराणा होलसेल ही चार दुकाने सात दिवसांकरिता बंद करण्याचे आदेश दिले.

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड करण्यात आला. एचडीएफसी बॅंक शाखा व 60 जणांकडून 17 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला. करोनासंदर्भातील नियम व प्रतिबंधात्मक उपाययोजना न पाळणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शिवाजीराव जगताप यांनी दिला आहे.

जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची दक्षता दुकानदार व व्यापाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये ही कारवाई करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.