नगर | अफूच्या शेतात पोलिसांचा छापा; 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

जामखेड – अफू लागवडीस बंदी असताना ही जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे एकाने आपल्या शेतामध्ये अफूची झाडे लावल्याचे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये आढळून आले. लसूण व घास असलेल्या शेतामध्ये 56 किलो वजनाचे 1 लाख 70 हजार रुपयांचे अफूचे झाडे पोलिसांनी जप्त केली.

या प्रकरणी वासुदेव महादेव काळे याच्याविरुध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. जातेगावमधील काळेवस्ती येथील एकाने आपल्या शेतामघ्ये अफूच्या झाडाची लागवड केली असल्याची माहिती जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना खबर्‍याकडून मिळाली होती.

त्यानुसार बुधवारी सायंकाळी गायकवाड यांनी कर्मचारी संजय लाटे, संदिप आजबे, संग्राम जायभाय, आबासाहेब अवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ यांच्यासह काळेवस्तीजवळील शेतीवर छापा टाकला. लसूण व जनावरांचा घास असलेल्या पिकांमध्ये अफूची झाडे लावले असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वासुदेव काळे याच्या नावावर शेत असल्याचे समोर आले. 56 किलो वजनाची अफूचे बोंडे व पाने पोलिसांनी जप्त केली.

तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. अफूची लागवड करणार्‍या काळे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द अंमली औषधेद्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नेमकी हा शेतकरी कशासाठी अफूची लागवड करत होता, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.