बारामती – बारामती शहर आणि एमआयडीसी परिसरात आज अचानक लॉजची तपासणी केली. लॉजवर टाकलेल्या या धाडीत 15 शालेय दशेत शिकणारी प्रेमीयुगुल सापडल्याने पोलिसांनाही धक्का बसला.
अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकांनी बारामती शहरातील विविध हॉटेल व लॉज तपासले.
बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील पोलिसांना सूचना केल्या होत्या. तसेच विविध लॉज हे बारामतीत चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याच्या संदर्भातील लोकांच्या तक्रारी पोलिसांच्या कानावर आल्याने पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार अचानक दुपारच्या वेळी शहर आणि एमआयडीसी परिसरातील काही लॉजची पोलिसांनी तपासणी केली.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या 15 ठिकाणच्या छाप्यात महाविद्यालयीन विद्यार्थी असलेली 11 जोडपी पोलिसांना या लॉजवर आढळून आली. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी समज देऊन सोडले, परंतु यापुढील काळात कोणतीही समज दिली जाणार नाही, लॉज मालकांवरही व व्यवस्थापकांवरही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिला.
आज अचानक पोलिसांनी लॉज तपासल्याने परिसरातील नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कॅफे व तत्सम उपहारगृहावर देखील पोलिसांनी धाडी टाकल्या होत्या. पोलिसांनी आज केलेल्या या कारवाईचे स्वागत करतानाच अशा कारवाया नियमित स्वरूपात कराव्यात अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लॉजच्या इमारतीचे ऑडिट तपासणार
दरम्यान शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉजवर प्रवेश दिला जात असेल, तर अशा लॉजमालकांवर कठोर कारवाई केली जाईल. बारामती नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने या अवैध कामे सुरू असलेल्या लॉजच्या इमारतीचे ऑडिट तसेच इतर तांत्रिक तपासणी देखील करून घेतली आहे की नाही हे देखील पाहिले जाणार आहे.
पालकांना सूचना देऊन कारवाई
दरम्यान, ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असेल तर अशा लॉज मालकांवर, व्यवस्थापकावर व कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई केली जाणार असल्याचे भोईटे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना आता समज दिली असली, तरी या पुढील काळात त्यांच्या पालकांना देखील याची माहिती कळवून विद्यार्थ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचा इशारा भोईटे यांनी दिला.