पॅरिस : नेटफ्लिक्स सध्या दोन देशांतील तपास यंत्रणाच्या निशाण्यावर आहे. नेटफ्लिक्सच्या फ्रान्स आणि नेदरलँडमधील कार्यालयांवर पोलिसांनी मंगळवारी छापे टाकले असल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व प्रकरण आर्थिक अनियमिततेच्या संबंधित आहे. फ्रान्स आणि नेदरलँड या दोन्ही देशांचे अधिकारी मागील काही महिन्यांपासून या प्रकरणासंदर्भात काम करत असल्याचंही सांगितले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बोलताना फ्रान्सच्या एका न्यायिक अधिकाऱ्याने सांगितले की, कर फसवणूक आणि आर्थिक अनियमिततेबाबत चौकशी केली जात आहे. तसेच नेदरलँडमध्ये फ्रेंच अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाई केली जात आहे. दरम्यान, फ्रान्समधील नेटफ्लिक्सच्या मुख्यालयात फ्रेंच पोलिसांनी शोधमोहीम राबवली आहे. फ्रेंच नॅशनल प्रोसिक्युटर्स ऑफिसच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचे विशेष पथक शोध मोहीम राबवत आहेत.
याबाबत नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की, ते फ्रेंच अधिकाऱ्यांसह तपासासाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. तसेच कंपनीचं म्हणणं आहे की, ते स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. तसेच सर्व कर नियमांचे पालनही करण्यात येत आहेत. कंपनी कोणत्याही देशात व्यवसाय करते. त्यामुळे कंपनी नेहमी कोणत्याही देशाच्या कायद्यांचे पालन करते.
दरम्यान, फ्रेंच अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही चौकशी नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू झाली होती. फ्रान्सच्या नॅशनल फायनान्शियल प्रॉसिक्युटर ऑफिसच्या म्हणण्यांनुसार नोव्हेंबर २०२२ मध्ये प्राथमिक तपासातून आर्थिक अनियमिततेबाबत काही गोष्टी आढळून आल्या आहेत. २०१९ आणि २०२० मधील नेटफ्लिक्स कंपनीचा फ्रेंच महसूल अंदाजे ६ दशलक्ष वापरकर्त्यांच्या ग्राहक संख्येशी विसंगत दिसला. फ्रेंच मीडियानुसार, नेटफ्लिक्सने २०१९ आणि २०२० मध्ये कॉर्पोरेट करांमध्ये फक्त १.०६ दशलक्ष भरले. मात्र, पुढे २०२० मध्ये फ्रान्समध्ये नेटफ्लिक्सची उलाढाल वाढली.