जेजुरी -शहरातील एका खोलीमध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी दोन महिला ठेवण्यात आल्या होत्या. अशी माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी बनावट ग्राहक पाठवून त्या ठिकाणी सापळा रचला. यावेळी दोन्ही महिलांची सुटका केली तर दोन जणांना जेरबंद करण्यात आले.
संकेत रामचंद्र गावडे (रा. गुणावरे ता. फलटण जि. सातारा) व ऋषिकेश राजेंद्र घाडगे (रा. जेजुरी ता. पुरंदर) असे ताब्यात घेतलेल्या दोनजणांची नावे आहेत. येथील एका घरामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्या ठिकाणी दोन पंचांसमक्ष दोन हजार रुपये देऊन बनावट ग्राहक पाठवण्यात आले. त्यावेळी पैसे घेऊन महिला पुरविण्यास दोघेजण तयार झाले.
त्यावेळी ग्राहकाने इशारा करताच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस कर्मचारी अक्षय यादव, गणेश कुतवळ, महिला पोलीस कर्मचारी खाडे आदींनी छापा टाकत मुंबई येथून आलेल्या दोन महिलांची सुटका केली. पुढे या दोन्ही महिला फलटण येथील दलालाकडे जाणार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
लॉजचीही होणार तपासणी
जेजुरी येथे लॉजवर उतरणाऱ्या महिला व पुरुषांची ओळखपत्रे, त्यांचा पूर्ण पत्ता व आवश्यक पुरावे असल्याशिवाय प्रवेश देऊ नये. अन्यथा लॉजची तपासणी करून गैरप्रकार आढळून आल्यास त्या लॉजचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. तसेच यापुढे परिसरातील लॉजची तपासणी पोलीस करणार असल्याच्या सूचना पोलिसांनी हद्दीतील लॉज व्यवस्थापनाला दिल्या आहेत.