नागरिकांचा आरोप : मटाले मळ्यात लाखो रुपयांचा ऐवज लंपास
बेल्हे – बेल्हे (ता. जुन्नर) येथील मटाले मळ्यात मध्यरात्रीच्या सुमारास एका घराची कडी तोडून घरातील लाखो रुपयांचे ऐवज लंपास केले आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) मध्यरात्रीनंतर घडली. याप्रकरणी विनायक मटाले यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांकडून रात्रीची गस्त होत नसल्याने चोऱ्यांच्या प्रमाण वाढत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मटाले मळ्यात विनायक मटाले यांचे घर आहे. घरातील सगळे जण झोपले होते त्यावेळी चोरट्यांनी घराची कडी तोडून चोरट्यांनी घरांमध्ये प्रवेश केला आणि कपाट उघडून त्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याची अंगठी, अर्धा तोळ्याच्या ठुशी तसेच आठ हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली आहे. तर कपडे व बॅगेतील इतर साहित्य घराच्या बाहेर टाकून देऊन पलायन केले.
सकाळी उठल्यावर घरातील साहित्य सर्व अस्ताव्यस्त पडलेले पाहून चोरी झालेच्या मटाले यांच्या लक्षात आल्यानंतर चोरीची घटना लक्षात आल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. घटनेचा पंचनामा सहायक उपनिरीक्षक एस. एन. भावारी, पोलीस निरीक्षक वेताळे, महेश पटारे यांनी केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वेताळे करत
आहेत.