बडगाम (काश्मिर) : जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात पोलिसांनी दहशतवाद्यांचे एक मोड्यूल उद्ध्वस्त केले. मिळालेल्या खबरीवरून बडगाममधील दहशतवाद्यांच्या पाच सहकाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
अहनवाझ अहमद वणी, नासीर अहमद वणी, बिलाल अहमद खान, इरफान अहमद पठाण हे गुंडीपोरा येथील रहिवासी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून अली महंमद भट या वरीहामा येतील तरूणाला ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. ते दहशतवाद्यांना निवारा आणि अन्य मदत करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे दहशतवाद्यांनी ठेवलेला शस्त्रसाठा जप्त केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.