…भय अजूनही संपत नाही…!

उमेश सुतार
कराड  – कराडकरांच्या मानगुटीवरील टोळीयुद्धाचं भूत आजही दबा धरून बसलं आहे. टोळीयुद्धानं धुमसणारं कराड अशांतच आहे. कराडमध्ये गुंडगिरी करणाऱ्या चार टोळ्यांना आतापर्यंत “मोक्का’ कायद्याचा चाप लावल्याच्या पोलीस दप्तरी नोंदी असल्या तरी कराड, मलकापूर परिसरातील गुंडगिरीची दहशत आजही कायम असल्याचे बुधवारी (दि. 6) रात्री आगाशिवनगर येथे घडलेल्या विकास लाखे खून प्रकरणावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

कराडला गुन्हेगारीचा मोठा इतिहास आहे. पूर्वी शहरात टोळ्या सक्रिय होत्या. वर्चस्ववादातून त्यांच्यात खटके उडायचे. हा वाद एवढा विकोपाला जायचा की, कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघायचे. शहर व परिसरातील वाढत्या टोळीयुद्धाला लगाम घालण्याचा विडा पोलिसांनी उचलला असला तरी त्यांना त्यामध्ये कितपत यश येईल, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, अशा वर्चस्ववादातून घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहेच, शिवाय अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्यही बिघडू लागले आहे, ही वस्तुस्थिती आहे.

यापूर्वी कराडमध्ये 20 ऑगस्टच्या मध्यरात्री वर्चस्ववादातून पवन सोळवंडे याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना घडली. या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगारीची पाळंमुळं खणून काढण्याचा प्रयत्न केला; पण ते गुन्हेगारीच्या मुळाशी जाऊ शकले नाहीत. त्यामुळेच या टोळ्यांनी आपले हातपाय पुन्हा पसरायला सुरुवात केली, हे कोणीही नाकारु शकत नाही. कराडमध्ये गुंडगिरी फोफावण्यास अनेक टोळ्या कारणीभूत असल्याचे पोलीस रेकॉर्डवरून दिसते.

संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्‍का) कायद्यान्वये साळवे टोळीवर कारवाई करण्यात आली. मात्र, युवराज साळवेच्या टोळीवरील कारवाईपूर्वी गेल्या दोन वर्षांत आणखी तीन टोळ्यांवर पोलिसांनी अशीच कारवाई केली होती. पटावरील प्यादी हेरून पोलिसांनी त्यांच्या मुसक्‍या आवळल्या असल्या तरी त्यातील वजिरांची आजही शहर व परिसरात दहशत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कराडमधील गुन्हेगारी टोळ्या मोडीत निघाल्या आहेत, असे पोलिस यंत्रणेचे म्हणणे असले तरी गेल्या काही वर्षांत नव्याने तयार झालेल्या गुंडांच्या टोळ्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

काही दिवसांपूर्वी या टोळ्या क्रियाशील असल्याचे दिसत होते, त्यांच्यावर काही गंभीर गुन्हे दाखल झाले असून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणी मागितल्याचा आरोप साळवे याच्यावर काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर साळवे टोळीच्या कारवाया आणखी वाढल्या. पोलिसांनी शिरवडे फाटा येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवत साळवेच्या कारमधून दोन रिव्हॉल्व्हर, दरोड्यासाठी आवश्‍यक असणारे साहित्य जप्त केले होते.

वारंवार घडणाऱ्या या गुन्ह्यांमुळे पोलिसांनी साळवे टोळीला मोक्का लावला. या घटना अद्यापही ताज्या असताना बुधवारी रात्री विकास ऊर्फ विकी लाखे याच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आल्याने टोळीयुद्धाचा भडका पुन्हा उडण्याची शक्‍यता आहे. या घटनेमुळे कराड व मलकापूर या शहरांमध्ये गुंडांच्या टोळ्यांमधील वर्चस्ववादाची दाहकता स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे कराडसह परिसरातील गुन्हेगारी संपवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

कोणाला लागतो मोक्का?
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एखादी टोळी वारंवार मालमत्ता किंवा शरीराविरुद्धचे गुन्हे करत असेल तर त्या टोळीला पोलिसांकडून मोक्का लावला जातो. संबंधित टोळीप्रमुखावर तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेला गुन्हा गत दहा वर्षांत दाखल झालेला असावा. किमान दोन गुन्ह्यांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल असावे, यासह अन्य काही निकष या कारवाईसाठी आहेत.

“कट्टा’ नेमका येतो कुठून?
कराडमध्ये गुंडगिरीचा उच्छाद वाढला आहे, हे शहर व परिसरात वेळोवेळी घडलेल्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, या टोळ्यांकडे पिस्तुले, गावठी कट्टे, बंदूका नेमक्‍या येतात कुठून, याचा शोध पोलीस यंत्रणेकडून का घेतला जात नाही? शहर परिसरातील किती जणांकडे विनापरवाना हत्यारे आहेत, यासारखे एक ना अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

…या टोळ्यांना लागलाय मोक्का
1) मयूर गोरे खून प्रकरण – सहा आरोपी : टोळी दीपक पाटील
2) बबलू माने खून प्रकरण – आठ आरोपी : टोळीप्रमुख सल्या चेप्या
3) उंब्रज दरोडा प्रकरण – पाच आरोपी : अहमदनगरची गॅंग
4) दरोड्याच्या तयारीतील टोळी – पाच आरोपी : टोळीप्रमुख युवराज साळवे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.