पोलीस अधिकारी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची

कर्जत – किरकोळ अपवाद वगळता कर्जत तालुक्‍यात लोकसभेसाठी मतदान शांततेत पार पडले. दिवसभर मतदान यंत्रातील बिघाड मतदार व अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली. कुळधरण येथे पोलीस अधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात बूथ लावण्यावरून बाचाबाची झाली. कुळधरण येथे 200 मीटरच्या आत बूथ लावल्याने पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांनी दुपारी बाराच्या सुमारास राष्ट्रवादीचे बूथ काढण्याची कारवाई सुरू केली. मात्र कार्यकर्त्यांनी 200 मीटरची सीमा दाखविणारी रेषा टाकण्यात आली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले. सीमारेषा आखली नसल्याने अंतर स्पष्ट होत नसल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यास जोरदार विरोध केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुधीर जगताप, बंटीराजे जगताप, बंडू सुपेकर, दादा गुंड, ओंकार गुंड, रवींद्र जगताप, कुमार जगताप यांची पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बाचाबाची झाली.

कर्जत, राशीन, मिरजगाव, माहिजळगाव, सिद्धटेक, भांबोरा, खेड आदी ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. चिलवडी, दगडी बारडगाव, कोकणगाव मिरजगाव, निमगाव गांगर्डा, कुळधरण, करमनवाडी येथील यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान ठप्प झाले होते. सकाळपासून सुरू असलेला मतदानाचा टक्का दुपारी एक ते तीन दरम्यान ओसरला. दुपारी तीननंतर मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. मशीनमधील बिघाडामुळे मतदारांची निराशा
कर्जत तालुक्‍यात ठिकठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे मतदार मोठ्या प्रमाणावर खोळंबले. नवीन ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यामध्ये विलंब लागल्याने मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. कुळधरण, निमगाव गांगर्डा आदी ठिकाणी सायंकाळी सहाच्या दरम्यान नवीन ईव्हीएम मशीन उपलब्ध झाल्याने सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा जैसे-थे होत्या. रात्री पावणेसात वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.