नवी दिल्ली : पोलिस सहाय्यक आयुक्त अनिल कोहली यांच्यावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास परवानगी दिल्याच्या दुसऱ्या दिवशी या करोना विरोधातील लढवय्याची प्राणज्योत मालवली.
या 52 वर्षीय योध्द्याला करोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपुर्वी निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर लुधियाना येथील एसपीएस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास पंजाब सरकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी मान्यता दिली होती.
कोहली यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्यांमध्ये त्यांची एक जवळची नातेवाईक, आणि दोन कनिष्ठ सहकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचीही करोना चाचणी घेण्यात आली असून त्यांचे निकाल प्रतिक्षेत आहेत. कोहली यांच्या मृत्यूने करोना विरोधातील लढ्यात आघाडीच्या फळीतील पहिल्या शिलेदाराचा पंजाबमध्ये मृत्यू झाला आहे.