पुणे: विश्रामबाग पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत असणाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने घरगुती कारणावरुण आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संजय बनसोडे (रा.सोमवार पेठ पोलिस लाईन) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तो मागील 14 वर्षे पोलिस सेवेत कार्यरत आहे. या सेवेच्या कालावधीत त्याच्यावर एकदाही कार्यालयीन कारवाई झाली नाही, इतके त्याचे काम चांगले होते. लॉकडाऊनपुर्वी त्याची पत्नी घरगुती वादातून त्याला सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर त्याने त्याच्या दोन मुलींना आईबरोबर इंदापूरला पाठवून दिले होते. शनिवारी रात्री ड्युटी संपल्यावर तो घरी आला होता. यानंतर त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या घरात कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणाचा तपास समर्थ पोलिस करत आहेत.
‘रविवारी सकाळी बनसोडे याचे घर बंद असल्याचे शेजारच्यांनी कळवले. त्याच्या घरी जाऊन पहाणी केली असता, त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. शवविच्छेदनाच्या अहवालातही गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.’
– बी.एस.कदम(वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस स्टेशन)