धाराशिव – गुन्ह्यात अटक न करता त्याचे गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलीस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षकाने संबंधिताकडे १ लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी १७ जानेवारी रोजी ५० हजार रूपये स्विकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकास अटक केली.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सूरज देवकर (वय ३५, रा. बाळे जि. सोलापूर) हे कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर पोलीस स्टेशन तामलवाडी येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सूरज देवकर यांच्या अधिपत्याखालील पोलीस अंमलदार यांच्याकडे आहे.
सदर तपास अधिकारी यांना सांगून नमूद तक्रारदार यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष १ लाख रूपये लाचेची मागणी केली. दरम्यान, १७ जानेवारी रोजी यातील पहिला हप्ता ५० हजार रूपये स्विकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम घेताना सूरज देवकर यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग: टोल फ्री क्रमांक: १०६४