-->

तक्रार नोंदवायला गेलेल्या महिलेसोबतच पोलीस निरीक्षकाची गैरवर्तणूक; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

लखनौ – हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिची छळवणूक होत होती. जाचाला कंटाळून अखेर तिने पोलीस ठाणे गाठले. येथे तक्रार नोंदवली जाईल आणि आपल्याला न्याय मिळेल अशी तिची अपेक्षा असावी. मात्र झाले भलतेच. ज्या पोलीस ठाण्यात ती गेली होती, तेथील पोलीस निरीक्षकाने चक्क एक गाणे म्हणायला सुरूवात केली आणि हे गाणे कोणत्या चित्रपटातले आहे असा प्रश्‍न त्या पीडितेला विचारला.

सर्द झालेली ती बिचारी यावर काय बोलणार? मात्र या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामुळे पोलीस प्रशसनात भूकंप झाल्याचे बोलले जात आहे.

लखनौच्या मोहनलाल गंज कोतवालीतील ही घटना असल्याचे वृत्त आहे. दिनानाथ मिश्र हे त्या महाभाग निरीक्षकाचे नाव आहे. देर लगी आने मे तुमको शुकर हे तुम आये तो..हे गाणे त्यांनी तिला ऐकवले. त्यानंतर त्याने गाणे कोणत्या चित्रपटातील आहे, असा सवाल तिला केला. झाला प्रकार बघून भांबावलेल्या महिलेने तक्रार न करताच तेथून परत जाणे श्रेयस्कर समजले. 

दरम्यान, याबाबत संबंधित महाशयांनी खुलासाही केला आहे. त्या महिलेसोबत जो प्रकार झाला त्याबद्दल आपल्याला तीन दिवसांपूर्वीच समजले होते. मात्र ती तक्रार करण्यासाठी तीन दिवसांनी आली म्हणून आपण ते गाणे म्हटल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर महिलेची तक्रार ताबडतोब नोंदवून घेण्यात आली असून निरीक्षकाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र त्याने आपल्यावरचे सगळे आरोप अर्थातच फेटाळले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.