पिंपरी : पिंपळे सौदागर येथे झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणाला जातीय रंग देऊन काहीजणांकडून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर आक्षेपार्ह मेसेज टाकले जात आहेत. यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांची करडी नजर आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिला आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे सौदागर परिसरात 7 जून रोजी रात्री एका तरुणावर हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अधिनियम आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना अटकही करण्यात आली आहे. संवेदनशील अशा या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव करीत आहेत.
या प्रकरणाला काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडविण्यासाठी खोडसाळपणे प्रक्षोभक, आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, हॅलो, टेलिग्राम व टिकटॉक व्हिडिओ अशा सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत. सोशल मीडियातून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच त्याला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी केले आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचा इशाराही ढाकणे यांनी दिला आहे.