Farmers Protest : कृषी कायद्याविरोधात संघर्ष सुरूच, मुख्यमंत्री खट्टर यांच्याविरोधातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अनेकजण जखमी

चंदीगढ, दि. 16 – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कार्यक्रमात निदर्शने करण्याच्या मुद्‌द्‌यावरून हिस्सार येथे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी धूमशान उडाली. पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून शेतकऱ्यांनी दगडफेक करत हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

हिस्सार येथे एका रुग्णालयाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री खट्टर आले होते. त्यांच्या या भेटीची जशी कल्पना शेतकऱ्यांना मिळाली, तसे ट्रॅक्‍टर आणि ट्रॉली घेऊन हजारो शेतकरी मुख्यमंत्र्याना घेराव घालण्यासाठी जमा होऊ लागले. पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅरिकेडस्‌ तोडून शेतकरी पुढे जाऊ लागले. त्यातून संघर्षाला सुरवात झाली.

आम्ही करोना पसरवतोय, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी या कार्यक्रमासाठी 500 लोकांना कशासाठी निमंत्रित केले, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या साथीमुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरी परतावे असे आवाहन त्यापूर्वी केले होते. परिस्थिती एकदा सुरळीत झाली की निदर्शने करावीत, असे आवाहनही खट्टर यांनी केले.

दरम्यान, हरियाणातील लॉकडाऊनची मुदत 24 मे पर्यंत वाढवण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल वीज यांनी जाहीर केले. लॉकडाऊन वाढवण्याच्या या कृतीचे वर्णन वीज यांनी सुरक्षित हरियाणा असे केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.