राहात्यात चोरांचा पोलिसांवर गोळीबार

एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी ः पोलिसांनी एका आरोपीस धाडसाने केले जेरबंद

आता तरी पोलीस गुन्हेगारी ठेचून काढणार का?
राहाता शहरात गुन्हेगारीचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात चोऱ्या, दरोड्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र या घटनांना आळा घालण्याऐवजी पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्याने गुन्हेगारी वाढत आहे. याचा फायदा घेत गुन्हेगार शिरजोर झाले असून, थेट पोलिसांवरच गोळीबार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे आतातरी पोलीस या गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचून काढून कायदा व सुव्यवस्था सुरळीत करतील का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

राहाता – सोनसाखळी चोरांना थांबविणाऱ्या पोलिसांवरच त्यांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस कर्मचारी अजित पठारे गंभीर जखमी झाले आहेत. सोनसाखळी चोरांनी दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पठारे यांच्या मानेला चाटून गेली, तर दुसरी हाताला लागली. आरोपींनी गोळीबार करूनही पोलिसांनी धाडस दाखवून एका सोनसाखळी चोराला जेरबंद केले. दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. गोळीबाराचा हा थरार आज दुपारी दोनच्या सुमारास घडला. अचानक भर रस्त्यावर गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.

सोनसाखळी चोरांच्या गोळीबारात पोलीस कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी सचिन ताके (रा. श्रीरामपूर) या सोनसाखळी चोरास जेरबंद केले. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सचिन ताके व त्याचा साथीदार मोटारसायकलवरून (क्र. एमएच- 15 सीएफ- 8299) गणेशनगरकडून चितळी रस्त्याने राहात्याकडे आले. शहरातील चितळी रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभ असल्याने महिलांची मोठी वर्दळ होती. त्यामुळे सोनसाखळी चोरी करण्याच्या उद्देशाने दोन्ही आरोपी नगरपालिकेच्या व्यापारी संकुलासमोर मोटारसायकल थांबवून उभे होते. त्यांनी आपले चेहरे काळ्या कपड्याने बांधलेले होते.

याच वेळी पोलीस कर्मचारी अजित पठारे व रशीद शेख हे तेथून जात होते. त्यांना या दोघांचा संशय आला. त्यामुळे त्यांनी आरोपींना हटकले. त्यामुळे आरोपी मोटारसायकलवरुन पळून जाऊ लागले. यावेळी पठारे व शेख यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एका आरोपीने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातून पोलिसांवर दोनदा गोळीबार केला. यात पोलीस कर्मचारी अजित पठारे यांच्या मानेला एक गोळी चाटून गेली, तर दुसरी गोळी हाताला लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. मात्र आरोपींनी गोळीबार करूनही शेख यांनी झडप घालून एका आरोपीला पकडले.

दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख सागर पाटील, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांवर गोळीबाराच्या या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांवरच गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. रशीद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात जिवे मारण्याचा व सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत राहाता पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.