पोलिसांचा तपास ठप्प; ठेवीदार हवालदिल
दिव्यदत्त दिगंबर पतसंस्थेतील तीस कोटींचा अपहार
सातारा – सातारा जिल्ह्यात नागरी सहकारी बॅंका, पतसंस्था आणि ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांच्या आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरू असली तरी सहकार खाते निद्रावस्थेतच आहे. गेल्या वर्षभरात अनेक पतसंस्थांच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल झाले असून या यादीत आता कोरेगाव येथील दिव्यदत्त दिगंबर नागरी पतसंस्थेचा समावेश झाला आहे.
तब्बल 30 कोटी 78 लाख रुपयांच्या अपहाराचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी तपास शून्यच आहे. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. पोलिसांनी या अपहाराची पाळेमुळे खणून संशयितांना अटक करावी, अशी मागणी होत आहे. दिव्यदत्त दिगंबर पतसंस्थेने सहकार खात्यातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाखाली अनेक वर्षे कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला.
व्यवसाय करताना सहकार कायदा, नियम व अटींचे बिनधास्त उल्लंघन केले. ठेवीदारांना आकर्षक परताव्याची प्रलोभने दाखवणाऱ्या योजना राबवल्या. त्यांची जाहिरातबाजी केली. त्यातून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अल्प कालावधीत जमा झाल्या. पतसंस्थेने व्यापक विस्तार करताना ठेवीदारांना मात्र रस्त्यावर आणले आहे. अनेक ठेवीदारांनी याबाबत राज्यांच्या सहकार आयुक्तांसह कोल्हापूर व सातारा येथील सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र, कागदी घोडे नाचवून अधिकाऱ्यांनी पतसंस्थेला सहकार्य करण्याची भूमिका कायम ठेवली.
मात्र, अखेर ठेवीदारांच्या दबावाखाली सातारा येथील शासकीय अप्पर लेखापरीक्षक कु. राणी घायताडे यांच्याकडे दिव्यदत्त दिगंबर पतसंस्थेचे प्रकरण सोपवले. अनेक पतसंस्था, सोसायट्यांमधील अपहार उघडकीस आणणाऱ्या घायताडे यांनी पाठपुरावा करत अपहार उघडकीस आणला. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले. दि. 20 ते 22 ऑगस्ट असे तीन दिवस गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व उपअधीक्षक सुहास गरुड यांनीही यात निर्णायक भूमिका घेतली. मात्र, कोरेगाव पोलिसांनी याचा तपास काही केल्या सुरू केला नाही. तपास ठप्प असल्याने ठेवीदार हवालदिल झाले
आहेत.





