मावळते पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची खंत
पिंपरी – पोलीस नागरिकांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील होत असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले, अशी खंत पिंपरी चिंचवडचे मावळते पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केली. सोमवारी (दि. 23) त्यांना निरोप देण्यासाठी आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते.
यावेळी निवृत्त महासंचालक अशोक धिवरे, महापालिकेचे आयुक्तश्रावण हर्डीकर, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांच्यासह परिमंडळ एक व दोनचे उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक आणि विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त पद्मनाभन यांचा सपत्नीक सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
यावेळी पद्मनाभन म्हणाले की, शहरात पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. मात्र, सुविधांचा अभाव असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये हळूहळू सुधारणा केली. त्यासाठी महापालिका आयुक्त हर्डीकर यांची मोठी मदत झाली. ओपन डोअर पॉलिसीनुसार मी नागरिकांना थेट भेटत असल्याने स्थानिक पोलिसांवर दबाव राहिला. त्यांच्यातही हळूहळू खूप सुधारणा झाली. माझा पोलीस सात ते दहा मिनिटांत नागरिकांपर्यंत पोहचला पाहिजे हा आग्रह होता आणि त्यात यशही आले. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असेल तरच काम करणे, ही पद्धत चुकीची आहे. पोलिसिंग ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
महापालिकेचे आयुक्त हर्डीकर यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, कसलीही पूर्वतयारी नसताना शहरात आयुक्तालय सुरु करण्यात आले. त्याची मोठी जबाबदारी पद्मनाभन यांच्यावर देण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष येऊन परिस्थिती पहिली. त्यांना बसायला नीट जागाही नव्हती, मात्र तरी देखील ते डगमगले नाही. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तर ते गडबडून गेले असते. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी चांगले काम करून दाखवले. निवृत्त महासंचालक धिवरे यांनी देखील पद्मनाभन यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, पद्मनाभन कोणावरही अवलंबून न राहता चोख कर्तव्य बजावणारा अधिकारी आहे. यावेळी त्यांनी पूर्वीचे काही किस्से सांगून जुन्या आठवणींना
उजाळा दिला.