श्रीनगर – काश्मीरातील एका पोलिस जवानाला मादक द्रव्ये बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून 750 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मुश्ताक अहमद पीर असे या पोलिस जवानाचे नाव असून तो पोलिसांच्या सशस्त्र दलात कार्यरत होता.
कुपवाडा जिल्ह्यातील हंडवारा येथे एका चेकपाईन्टवर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे हा साठा सापडला. तो ज्या कार मधून हा साठा नेत होता ती गाडी जप्त करण्यात आली असून पीर याला अटक करण्यात आली आहे.
काश्मीरात आता मादक द्रव्यांचा चोरटा व्यापारही सुरू झाला असून त्यात पोलिसांचाहीं सहभाग आता उघड होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या पोलिस जवानाचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत किंवा कसे याचीही आता चौकशी केली जात आहे.